अलिबाग, अमूलकुमार जैन
रायगड जिल्ह्यात रोहा येथे अदखल पात्र गुन्ह्यात अटक करू नये यासाठी लाच मागणाऱ्या लाचखोर सहाय्यक फौजदार गोविंद रघुनाथ मदगे,( वय 54 वर्षे, धंदा- नोकरी, सहाय्यक फौजदार, नेमणूक रोहा पोलिस ठाणे, राह-मु.पो. नांदगाव, आदिवासी वाडी जवळ, तालुका कर्जत, जिल्हा रायगड ) हा सहा हजार रुपयांची लाच घेताना रायगडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रोहा बाजारपेठ पोलीस वाहतूक चौकीजवळ, तीन बत्ती नाका येथे सापडला आहे.
जनतेच्या रक्षणाची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर आहे. परंतु, पोलीस खात्याला देखील काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे डाग लागत आहे. तक्रारदार यांचे वडील कांतीलाल तुकाराम वाघमारे यांनी त्यांची पत्नी प्रवीणा कांतीलाल वाघमारे यांच्याविरुद्ध दिनांक 04/03/2024 रोजी वाद होऊन झटापट केले बाबत तक्रार दिली होती. सदर बाबत रोहा पोलिस ठाणे येथे अदखलपात्र गुन्हा क्रमांक 116/24 कलम 323 भादवी अन्वये तक्रार नोंद आहे. सदरचे प्रकरण कौटुंबिक व अदखलपात्र स्वरूपाचे असून देखील तक्रारदार यांना लाचखोर गोविंद रघुनाथ मदगे यांनी पैसे उकळण्यासाठी घाबरवले. रायगड जिल्ह्यातील रोहा पोलीस ठाण्या अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या एका प्रकरणात तक्रारदार यांच्या आईला अटक करावी लागेल असे तक्रारदार यांना बोलावून घाबरवले व सदर तक्रारीत मदत करण्यासाठी रक्कम रुपये 10000 लाचेची रक्कम मागणी केली व तडजोडीअंती रक्कम रुपये 6,000/- स्वीकारण्याचे मान्य करून सदरची रक्कम लाच म्हणून रोहा बाजारपेठ पोलीस वाहतूक चौकीजवळ, तीन बत्ती नाका येथे स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. सहायक फौजदार गोविंद मदगे यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याने रोहा तालुक्यासहित रायगड जिल्ह्यातील पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
सदर कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र चे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे,अप्पर पोलीस अधीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाल लाच लुचपत विभाग रायगडचे उप अधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विनोद जाधव, सहायक फौजदार शरद नाईक, पोलीस हवालदार महेश पाटील, पोलिस हवालदार कौस्तुभ मगर यांनी केली आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास, तात्काळ आमचेशी दुरध्वनी क्रमांक ०२१४१- २२२३३१ वरसंपर्क साधाण्याचे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाडावे यांनी केले आहे.