कर्जत, गणेश पुरवंत
कर्जत तालुक्यात डोंगर दुर्गम भाग मोठ्या प्रमाणात आहे. तर आदिवासी समाजाची वस्ती देखील तालुक्यात मोठी आहे. आदी गोष्टींमुळे जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कुपोषणाविषयी जनजागृती व्हावी यासाठी युनायटेड वे व प्रिझम संस्थेकडून तालुक्यात गावोगावी कुपोषणविषयी जनजागृती करण्यात आली आहे.
युनायटेड वे मुंबई व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यातील देऊळवाडी, वावे, हालीवली, कोषीने,वांजळे, सावरगाव अशा विविध ठिकाणी कुपोषण मुक्त भारत या पथनाट्यातून कुपोषण विषयक जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमास युनायटेड वे मुंबईचे प्रोजेक्ट समन्वयक रेखा चौधरी, पोषण कार्यकर्ते मोहिली बीट प्रतीक्षा ठोंबरे, पोषण कार्यकर्ते मोहिली बीट वासंती बडेकर, प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी नंदकुमार गोंधळी यांसह अन्य मान्यवर व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. या पथनाट्यातून मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच तिचे लग्न करा व पाहिले बाळंतपण वयाच्या विसाव्या वर्षानंतर करा, गरोदरपणात महिलांनी कोणती काळजी घ्यावी, गरोदर मातेच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे, अंडी, दूध, मास, मच्छी इत्यादीचा समावेश असावा, सरकारने कुपोषणा पासून दूर राहण्यासाठी बऱ्याच योजना सुरू केल्या आहेत वेळोवेळी लसीकरण प्रसुती पूर्व गरोदर स्त्रियांना अमृत आहार योजनेचा मोफत लाभ देखील देण्यात आला आहे, गर्भवती महिलेची नोंद प्राथमिक आरोग्य केंद्रात, उपकेंद्रात, शासकीय रुग्णालयात किंवा खाजगी रुग्णालयात करणे आवश्यक आहे, बाळाच्या जन्माच्या पहिल्या एक तासात मातेचे पहिले दूध बाळाला दिले गेले पाहिजे हे बाळाचे पहिले लसीकरण आहे त्यामुळे त्याची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते असा संदेश देण्यात आला तपस्वी गोंधळी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या पथनाट्यात प्रतीक कोळी, विनोद नाईक, सुचित जावरे, सार्थक गायकवाड, नेहा पाटील, यश देशमुख, सांची म्हात्रे, सिद्धार्थ ठाकूर आदी कलाकार सहभागी झाले होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता युनायटेड वे मुंबईचे कार्यकर्ते तसेच त्या त्या गावच्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर यांनी परिश्रम घेतले.