कर्जत, गणेश पुरवंत
थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या माथेरान वन विभागाच्या भोंगळ कारभाराचा प्रत्यय आज माथेरानकरांना आला आहे. रेल्वे स्थानकासमोरील बाजारपेठेतील असलेल्या पटेल किचन घावरे डेअरी या हॉटेल वर सुमारे दिडशे वर्ष जुने असलेले झाड पडून, सदर हॉटेलचे नुकसान झाले आहे. सुदैवानी जिवितहानी टळली आहे.
माथेरान रेल्वे स्थानका समोरील बाजारपेठेतील असलेल्या पटेल किचन घावरे डेअरी लगत सुमारे दिडशे वर्ष जुने नांदूरकीचे मोठे झाड होते. सदर झाडाचा बुंधा वाळवीने आतून पोखरला असल्याने झाड तोडण्याच्या परवानगीची तक्रार माथेरान वन विभागाकडे वारंवार करण्यात आली होती. मात्र याकडे माथेरान वन विभागाने दुर्लक्ष केल्याने, अखेर दिडशे वर्ष जुने असणारे नांदूरकीचे झाड अचानक कोसळले. हॉटेल पटेल किचन घावरे डेअरी च्या शेडवर झाड पडल्याने हॉटेलचे ५० ते ६० हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या वेळेत हॉटेलमध्ये पर्यटक नव्हते म्हणून एप्रिय घटना टळली. यावेळी वन विभागाचे वनरक्षक अधिकारी आडे यांनी घटना स्थळाचा पंचनामा नकरता झाड हटवून घ्या उदया काय आहे ते पाहु असे सांगत घटना स्थळावरून निघून गेल्याचे माजी नगरसेवक प्रदीप घावरे यांच्या कडून सांगण्यात आले आहे. तर हे दिडशे वर्ष जुने असलेले मोठे झाड पडताना झालेल्या आवाजामुळे त्या परिसरातील रस्त्यावरील पर्यटक व नागरिक घाबरून आपला जिव मुठीत घेवुन पळाल्याचे ही स्थानिकांकडून सांगितले जात आहे. तर वनविभागाच्या दुर्लक्षपणातून घडलेल्या घटनेमध्ये हॉटेल पटेल किचन घावरे डेअरी यांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी माथेरान वन विभाग काय भूमिकेत असणार या कडे मात्र हॉटेल चालक – मालक व माथेरानकरांचे लक्ष लागले आहे.