केळवणे, अजय शीवकर
प्रशासनाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष
उरण, पेण, पनवेल या तिन्ही तालुक्यांना जोडणारे सर्वात मोठे गाव म्हणजे केळवणे. जवळजवळ दोन हजार एकर धान्य पिकणाऱ्या शेती असणारे सधन असे हे गावं. गावाच्या लोकांची शेती हीच मुख्य उपजीविका. परंतु गेल्या बारा वर्षांपूर्वी शेती आणि समुद्र यांच्यामध्ये असलेला खारबांधिस्त बंधारा फुटल्याने, संपूर्ण शेतीमध्ये समुद्राचे खारे पाणी शिरले. त्यानंतर काही राजकीय मान्यवरांनी आपापल्या परीने खारबंदिस्त बांधून शेतकऱ्यांना दिलासा दिला. यामुळे गेल्या काही वर्षात ओसाड आणि नापीक झालेली शेतजमीन पूर्ववत होऊ लागली आहे. शेतकऱ्यांनी पुन्हा नव्या उत्साहाने व दमानं आणि मेहनतीने आपापली जमीन कसायला सुरुवात केली असताना, वाळू माफिया समुद्रातून वाळू चोरी करण्याच्या नादामध्ये येथील खारबंदिस्तीकडे दुर्लक्ष करत आहेत. बंधऱ्याला लागून वाळू उपसा होतं असल्याने, बंधरा कमकुवत होतं आहे. बंधऱ्याला जागोजागी तडा जाऊन अगदीच फुटआईच्या अवस्थेत आला आहे. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन योग्य बंदोबस्त केला नाही तर आतापर्यंत केलेली शेतकऱ्यांची सर्व मेहनत वाया जाऊन तोंडात आलेला घास जायची शक्यता आहे. तर शेत शेकडो एकर शेत जमीन खाऱ्या पाण्याच्या शिरकाव्यामुळे नष्ट होणार आहे. एकीकडे शेतकरी आणि शेती वाचली पाहिजे असा नारा प्रशासनाचा होत असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असतानाचे चित्र उरण, पनवेल आणि पेण विभागात दिसत आहे. प्रशासनाने याची वेळीच दाखल घ्यावी आणि येथील पिकती शेतजमीन वाचवावी अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत.
प्रशासनाने या वाळू माफियांविरुद्ध कठोर कारवाई आणि खारबंदस्तिचा चोख बंदोबस्त करावा अशी सर्व शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.