कर्जत, गणेश पुरवंत
गोवांशिय जनावरांच्या बेकायदा वाहतुकीबाबत नेरळ पोलिसांनी मोहीम सुरू केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा पाषाणे चिकणपाडा रस्त्यावर कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ३ अनेक गोवंशिय जनावरांची सुटका झाली आहे. या दमदार कामगिरीने नेरळ पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कर्जत तालुक्यात नेरळ पोलीस ठाणे हद्दीत गेले काही महिने गोवंशिय जनावरांची बेकायदा वाहतूक करून त्यांना कत्तलीसाठी नेले जात असल्याच्या घटना वारंवार घडत होत्या. त्यामुळे नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी याबाबत कारवाईची मोहीम उभी केली. त्यामुळे बेकायदा गोवंशिय जनावरांच्या वाहतुकीला मोठा चाप बसत असल्याचे चित्र आहे. तर या कारवाईमुळे शेकडो जनावराचे जीव वाचले आहेत. अशात दिनांक ११ जून रोजी पाषाणे रस्त्याने जनावरांची वाहतूक होणार असल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली. एक पथक तयार करून सबंधित ठिकाणी पाठवण्यात आले. साधारण सकाळी ७.४५ च्या सुमारास टेम्पो क्रमांक एमएच ४६ बीयू ७२६१ हा संशयास्पद स्थितीत माले गावाजवळ दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला थांबवत चौकशी केली असता त्यात ३ गोवंशिय जनावरे दाटीवाटीने भरलेली पोलिसांना मिळून आली. तर यात आरोपी यासिम युनूस सुरमे रा. चिकणपाडा याला पोलिसांनी टेम्पोसह ताब्यात घेतले आहे.
याबाबत नेरळ पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३७९, प्राणी संरक्षण कलम कायदा (५) अ, (५) ब, चे उल्लंघन ९ सह, प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० चे कलम ११(१)(घ)(ड)(ज) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नवनाथ म्हात्रे हे करीत आहेत.