|| डोळा पाहू दे पंढरी, विठुरायाची नगरी ||
हे जीवन घेरलेय ते षड् रिपूंनी. काम, क्रोध.. लोभ.. मोह.. मद.. मत्सर या सहा शत्रूंना हरवणे भल्याभल्यांना शक्य नाही. अहंकार तर क्षणोक्षणी उफाळून येतो. या षड्रिपूवर विजयासाठी वारी. ही पंढरी वारी आत्मविश्वास निर्माण करते. परमेश्वरावरचा श्रद्धाभाव दृढ करते. समुहात एकत्रितपणे असेल त्या परिस्थितीत ऊन ..वारा.. पावसाचा सामना करत पायी चालायला.. राहायला शिकवते. सुखी व्यवस्थेचा सदैव पाठलाग करणाऱ्या मनुष्याला निसर्ग सहवासातील साध्या नाविण्यपूर्ण जीवनाचा आनंद .
कोमसाप उरण शाखेचा उपक्रम
सौजन्य- श्री.अजय शिवकर
(सचिव कोमसाप उरण)
वारीचा काव्यातून विठूरायाचा सहवास घडावा, शब्द शब्दाने आपले आतंरंग विठूमय व्हावे, आपले जीवन भक्तीरसाने भरून निघावे म्हणूनच आपल्यासाठी ही 'आषाढ काव्य वारी'
१) वारी
चाललो मी पंढरी
विठूरायाच्या दरबारी
भोळ्याभक्तीचा मनी भाव
असा मी एक वारकरी ||
चाललो मी पंढरी
उभी अठ्ठाविस युगे माझी माऊली
गजर हरी किर्तनाचे स्वर
दिसे सावळे रुप गाभारी||
चाललो मी पंढरी
तिथे नामदेवांची पायरी
माथा टेकीन मी भक्तीने
आमुची आनंदाची वारी||
चाललो मी पंढरी
भाव भक्तीचा जागर
रिंगणात विठूराया
वैष्णवांचा हा सागर||
चाललो मी पंढरी
दर्शने अश्रू येती नयनी
देवा सांभाळ लेकरे
प्रार्थना ही तुज चरणी|| .
श्री. किशोर परशुराम म्हात्रे
कर्जत
२) संत निवृत्तीनाथ
मा पिता वास्तल्ये । भावंडास ळला ।
भोगी द्वेषकला । पित्रुबंधू ।।
महदभाग्य ते । दिक्षा नाथ पंथे ।
श्री गहिनीनाथे । गुरु दिक्षा ।।
योग अद्वेतांचं । कृष्णाचे अभंग ।
नाम भक्ती दंग । विठू पायी ।।
अकाली उडाले । मातृ-पितृछत्र ।
ज्येष्ठ ज्ञाता पुत्र । श्री निवृत्ती ।।
अध्यात्म धनाचे । दान ज्ञानदेवा ।
करा धर्मसेवा । अज्ञायिले ।।
आदेशी ज्ञान्यास । संस्कृत गीतार्थ ।
बोधावा गुह्यार्थ । सोपे सोपा ।।
भावार्थ दीपिका । लिहा ज्ञानेश्वरी ।
माने आज्ञा हरी । ज्ञानदेव ।।
विकार निवृत्ती । तेव्हा ज्ञान मिळे ।
सोपा नव्हे कळे । मुक्ती मार्ग ।।
ज्येष्ठ द्वादशीला । समाधिले स्वारी ।
प्राप्त मुक्त चारी । त्र्यंबकेसी ।।
सचिन राम ठोंबरे
कलोते खालापूर रायगड
३) आषाढीची वारी (अभंग)
पायी पायी चाले/ दंगुनिया सारी//
आषाढीची वारी / पंढरीला//१//
विठ्ठलाचे नाम/ सदा घेता मुखी //
भक्तजण सुखी/ मनोमनी//२//
दर्शनाची आस/ ठेवुनिया ध्यानी//
गोड गायी वाणी/ वारकरी//३//
सावळा तो हरी/ उभा विठेवरी//
चंद्रभागे तिरी/ भक्तांसाठी//४//
टाळ विणा हाती/वाजवी मृदुंग//
भजनात दंग/ भक्तजण//५//
पांडुरंगापुढे/ एक होती सर्व//
विसरुनि गर्व/ उच्च निच//६//
सर्वां लाभो सुख/ घालते साकडे//
विठुराया पुढे/लीनपणे//७//
सौ.वनिता गणेश शिंदे
मु.पो.गडद,ता.खेड,जि.पुणे
४) आनंद वारी
आषाढी कार्तिकी । पंढरीच्या वारी
विठ्ठलाच्या दारी । भक्तगण।।१ ।।
गावा गावातून । निघे वारकरी
पंढरीच्या वारी । पायी पायी ।।२।।
नसे भय चिंता । ऊन पावसाची
ओढ ही भेटीची।विठ्ठलाच्या ।।३।।
पांढऱ्या पोशाखी। शोभे वारकरी
आनंदाच्या वारी । चालताना ।।४ ।।
ज्ञाना तुकयाचा । करीत गजर
चाले वाटेवर । पंढरीच्या।। ५ ।।
चंद्रभागे स्नान । पंढरी निवास
भेटीचा हा ध्यास।विठ्ठलाच्या ।।६।।
पंढरीच्या वारी ।नसे जाती भेद
भेटीची उमेद । सर्वांलागी ।।७ ।।
तुज भेटण्यासी । येती वारकरी
ईच्छा पूरी करी । त्यांची देवा ।।८।।
पंढरी निवासी । विठ्ठल सावळा
भक्तांवरी लळा । लावतसे ।।९ ।।
जाता पंढरीसी ।भेटी विठ्ठलासी
आनंद मनासी । वाटतसे ।।१०।।
कवी-पी.जी.ठाकूर.उरण, रायगड .
५) माझा पाठिराखा,अभंग
असे पाठिराखा। माझा पांडुरंग।
जीवे भरी रंग। माझ्या सदा ।।१।।
पुढती लागून। मार्ग दाखविला।
रस्ता चुकविला। गैरमार्ग।।२।।
विचार कल्लोळ। मनी दाटे जेव्हा।
शांत केले तेव्हा। नाम घेता।।३।।
फसता कधिही। संकटांच्या खाई।
धावे माझी आई। विठाबाई।।४।।
जन्माचा होतो मी। अभागी, करंटा।
वाजविली घंटा। भाग्याचिया।।५।।
भरून पावलो। पंढरीच्या नाथा।
गातो तुझी गाथा। सत्यवान।।६।।
प्रा.सत्यवान शांताराम घाडी.
ठाणे
६) विठ्ठल सावळा
विठ्ठल सावळा l रखुमाईसंगे l
भजनात रंगे l भक्तांसवे ll
भजन, पूजन l टाळ नि अभंग l
भक्त सारे दंग l किर्तनात ll
तुळशीच्या माळा l घालुनिया गळा
जणू दिसे मळा l भक्तीचा हा ll
तुझ्या दर्शनाने l होई मन शांत l
जीवाचा आकांत l लोप होई ll
होता पायी लीन l पुरे होई काम l
हेची चारधाम l पांडुरंग ll
देवा, विठुराया l सर्वांना तारणे l
एकची मागणे l तुजपाशी ll
विठू माझा सखा l विठ्ठल सोबती l
करूया आरती l जिवेभावे ll
पंढरपूरची l वारी भाविकांची l
कामना मनाची l पूर्ण करी ll
llजय जय विठ्ठल रखुमाई ll
सौ. संजना विद्याधर जुवाटकर
कळवा, ठाणे
७) पंढरीची वारी !
विठ्ठलाचे भक्त । नाना नगरीत ।
येती पंढरीत । वारीसवे ।।
ठेवुनी मनात । विठ्ठल ध्यानात ।
करती जोशात । वारी पूर्ण ।।
दिंड्या व पताका । थाट पालखीचा ।
घोष माऊलीचा । वारीमध्ये ।।
आळंदी जेजुरी । करीत वाखरी ।
पोहचे पंढरी । वारी नीट ।।
उभी आणि गोल । होतात रिंगणे ।
डोळ्यांचे पारणे । फेडी वारी ।।
भारुड नर्तन । आणिक फुगडी ।
भक्तीभावे उडी । वारीतच ।।
भजन कीर्तन । चिंतन मनन ।
तृप्त होई मन । वारीमध्ये ।।
होई तो गजर । टाळ मृदुंगाचा ।
विठूच्या नामाचा । वारीभर ।।
एक होई कैसा । अवघाची रंग ।
वारकरी दंग । वारीत तो ।।
हरीच्या नामाने । हरपते भान ।
मिळे समाधान । वारीमुळे ।।
विठूच्या दर्शने । होई परिपूर्ण ।
सुफळ संपूर्ण । वारीऐसी ।।
प्रविण शांताराम ,पनवेल, रायगड
८) विठ्ठल
वाळवंटी देवा ,उभा विटेवरी
भेटण्या रे देवा, आले तुझ्या दारी
भक्त सारे विठ्ठला,आले तुझ्या घरी
भरले पंढरपूर,घडली यंदा वारी
असे अबीर गुलाल,असे माळकरी
टाळ चिपळ्या संगे,दंग वारकरी
पाऊले चालती, नेहमी तुझी वारी
दुमदुमली आज, माझी पुण्यनगरी
असे नामाचा गजर,चंद्रभागा तिरी
मेळा भक्तांचा, भरला या घाटावरी
भेट तुझी झाली,तुझ्याच मंदिरी
सुखी ठेव देवराया,मुले बाळे सारी
प्राची दिनेश कर्वे
९) पंढरी
चला जाऊ पंढरीला
आषाढी एकादशीला।ध्रु।
पालखीचे अपूर्व दर्शन
अश्रू नयनी वंदिता चरण
टाळ मृदुंग ऐकायला
चला जाऊ पंढरीला।१।
गाऊ नाम विठूमाऊलीचे
प्रेम वृक्षाच्या साऊलीचे
विठ्ठलाच्या दर्शनाला
चला जाऊ पंढरीला।२।
चंद्रभागेत करून स्नान
गाऊ देवाचे भक्तिगान
संत जनाच्या या माहेराला
चला जाऊ पंढरीला।३।
संजीवनी मोकाशी
बोरिवली
१०)🚩🚩 आषाढ काव्य वारी🚩
निघाली सकाळ। करण्यास वारी।
तुळस मंजिरी। घेऊनिया॥
बहुगुणी रोप। ऑक्सिजन बाग
क्षमविते आग। चालताना॥
चाले वारकरी। पंढरीची वाट
किती वर्णू थाट। वैष्णवांचा॥
मी विठूरायाचा। झालो वारकरी।
ध्वजा खांद्यावरी। भाग्वताची ॥
पाहिली पंढरी।आज मी सकाळी।
टिळा शोभे भाळी। विठ्ठलाच्या॥
विठ्ठलाच्या संगे।उभी रखमाई।
आशीर्वाद देई।भक्तगणा॥
आषाढी वारीला। भेटे विठूराया।
पडतो मी पाया। भक्तीभावे॥
तृप्त झाला म.का। पाहता पंढरी।
बोलते वैखरी। वैष्णवांची॥
श्री.मच्छिंद्रनाथ का.म्हात्रे
वशेणी -उरण -रायगड