आषाढ काव्य वारी
कोमसाप उरण शाखेचा उपक्रम
सौजन्य- श्री.अजय शिवकर (सचिव कोमसाप उरण)
जगाला कुतुहल असणारी, भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी, अध्यात्मिक आणि आंतरिक सुख देणारी वारी म्हणजे पंढरपूरची वारी. ही वारी अवघडही आहे.. अगदी सहजही आहे.
आमची संत मंडळी म्हणजे मनुष्य जीवनाचे भाष्यकारच. हे जीवन क्षणभंगुर आहे. ते पण वेगवेगळ्या वाटेने वळणावळणाने जाणारे. या वाटा सुगम करणारी ही आनंदाची वारी. या वारीचा आनंद काव्यातून व्हावा, विठूरायाचा सहवास घडावा, शब्द शब्दाने आपले आतंरंग विठूमय व्हावे, आपले जीवन भक्तीरसाने भरून निघावे म्हणूनच आपल्यासाठी ही ‘आषाढ काव्य वारी’

भाग –१
१) विश्वि ठसावला विठ्ठल
डोईवरी टोपी, गंध -बुक्का,तुलसीमाळ
गजर हरीनामाचा निघाला सावळ्याचा बाळ
भान हरपूनी गणगोत, हाती धरूनिया टाळ
पाठीवरी घरदार, पोटी तान्हूल रे बाळ
काट -कूट नका म्हणू नाही उन्हाचे चटके
तहानभूक नका म्हणू आम्ही विठूचे भटके
विठुराय उभा जेथे जाऊ आम्ही तेथे
कांदा -भाकर भरवाया विठू येऊनिया भेटे
कशी निखरली काया सूर्यदेवाच्या कृपेनें
कधी वर्षाव कृपेचा वरुण देवाच्या भेटीने
कधी रिंगणात या येऊनी पहा रे
नामघोष सावळ्याचा, ज्योत अंतरी पेटवारे
वारकरी विणे वस्त्र, हरीनाम हेचि सूत्र
सकळ आनंदी आनंद, सुखी भूमी पुत्र
आया -बाया, पोर-टर, वाट चालती थोर
ध्यास एक मनी त्यांच्या विठुरायाचा जागर
आज पहिला कळस, आले आले पंढरपूर
विठुरायाची हाक भिडे थेट काळजास
त्याचा कासावीस जीव, भक्ताच्या भेटीस
धाव घेई गाभाऱ्यातून विश्वि ठसावला विठ्ठल
जय हरी विठ्ठल
लीना विवेक
धुळे

२) दर्शन विठूमाऊलीचे
होई समाधान।पाहे विठू डोळा।
भाव असे भोळा। विठूपायी।।१।।
सार्थक जन्माचे। जे दर्शन घेती।
नेत्री अश्रु येती ।आनंदाचे।।२।।
गजर नामाचा। टाळ मृदंगात।
धुंद ते नामात। वारकरी।।३।।
मस्तक चरणी । पंढरी येऊनी।
दर्शन घेऊनी । ठेवियले।।४।।
जन्माचे सार्थक। टेकविता माथा।
विलिनता आता। चरणाशी।।५।।
जय हरी नाम । विठ्ठल गजर।
विठूचा जागर। नित्य होई।।६।।
संसार सागरी। नामात राहूनी।
संकटे साहूनी । पार करु।।७।।
निर्मळ नितळ। दयेचा सागर।
भक्तांचे आगर । पांडूरंग।।८।।
नित्य असू देत।आम्हावरी कृपा।
भक्तांचा तू नृपा ।दयावंता।।९।।
सौ. दिपाली प्र. कांदळगांवकर, ठाणे

३) आम्ही वारकरी
अभंग
चला जावू वारी
देवाचीये द्वारी
पंढरीसी जाता
विठ्ठल कैवारी..
नेमाची ती वारी |आम्ही वारकरी
निघालो पंढरी|आनंदानेll
पंढरीची ओढlलागलीजीवास
साऱ्या जीवा ध्यासlपांडुरंग ll
एकत्र चालले l वारकरी सारे
दंग झाले पुरे lभजनातll
नाही काही भेद lनाही काही तंटा
सोडवितो गुंता lविठुरायाll
सारे राव गाव l स्वागत करिती
साऱ्यांच्याच चित्तीlएकभावll
आम्ही वारकरीlचाललो चाललो
एकरूप झालो lनामामधेll
आम्ही वारकरीlजातो पंढरीस
जीव कासावीस lदर्शनासll
किरण जोशी,
दिघी,पुणे

४)
🚩 वारी 🚩
कैवल्यांचा नाथ तो
माझा सखा पांडुरंग ,
टाळ – मृदुंगाची थाप
सारे वारकरी दंग ॥१॥
आषाढी एकादशी द्वारी
चाले तुका ज्ञानियेची वारी ,
विठु नामात रंगली
माझी पंढरी ही सारी ॥२॥
कोणी रंक नाही राव
विठु नामाचा हा ध्यास,
वाटेवरी होतो मला फक्त
माझ्या विठूचा हा भास ॥३॥
पंढरीचा हा सावळा
माझ्या रुक्मिणीचा हरी ,
सार्या दुखाःचा विसर
फक्त पंढरीची वारी ॥४॥
समय प्रस्थानाचा येता
हाले कळस आंळदीचा ,
भेटी लागली ही जीवा
माझा राजा पंढीराचा ॥५॥
पंढरीची ही वारी जणू
आहे संमिधराची लाट ,
युगे युगे पाहते मी
माझ्या विठूची ही वाट ॥६॥
रोशनी दाभाडे

५) आलो दर्शनाला
आलो दर्शनाला तुझ्या विठुराया
तुझ्या भेटीसाठी शिणली काया
नतमस्तक झालो तव चरणाशी
पडतो वाकूनीच मी तुझ्या पाया
रंजलो गांजलो पिचलो दुःखाने
भर विठुराया झोळी ही सुखाने
आलो शरण ही आस दर्शनाची
एकरूप असे तुजशी तनमनाने
नको अव्हेरूस ठेव चरणापाशी
गुंफतोय नाते तुझ्याच नावाशी
राहीन जवळ करीन तुझी सेवा
द्यावे दर्शना मी राहिलो उपाशी
करतो वारी आषाढी कार्तिकीला
तुझ्या भेटीसाठी आलो पंढरीला
दान दर्शनाचे राहूदे मज गाठीला
सावळ्या श्रीहरी भोळ्या विठ्ठला
डोईवरी तुळस घेऊनी वारकरी
पंढरपुरात भेटते सुखाची पायरी
घास नैवेद्याला आणला प्रेमभरे
तव चरणी मिळू दे मज ओसरी
सौ. भारती सावंत
खारघर, नवी मुंबई

६) पंढरीच्या हो वारीला
हो.. जाऊ चला जाऊ चला, पंढरीच्या हो वारीला
हाती टाळ मृदुंग विणा, मुखी विठ्ठल विठ्ठल बोला
हो… जाऊ चला //धृ//
डोळे भरून पाहू चला, पंढरीच्या सावळ्याला
कपाळी शेंदूराचा टिळा, वैष्णव भक्तीत रंगला
झिम्मा फुगडी खेळू चला, भेट दे रे बा विठ्ठला
हो… जाऊ चला //1//
हाती चोपड्या घेऊन, करू चरित्र लेखन
वैष्णवांचे संगतीत, आलवू देवाचे भजन
वारकरी घालतो रिंगण, मनी विठ्ठलाचे ध्यान
हो…जाऊ चला //2//
तुका अभंगी वदला, नामदेव कीर्तनी गर्जला
समतेचा संदेश दिला, मानवाच्या उद्धरण्याला
दृष्ट भाव हा सारला, जगी मैत्री भाव वाढविला
हो…जाऊ चला//3//
गळा हार तुळशीमाळा, वारकरी विठ्ठल नामात दंगला
जमला वारकऱ्यांचा मेळा, चंद्रभागेच्या तिराला
साधू संतांच्या भूमितला, स्वर्गीय सुखाचा सोहळा
हो…जाऊ चला //4//
श्री.नरेश गणपत पाटील
अलिबाग

७) भक्तीचा पाऊस
भक्तीच्या पावसात | चिंब वारकरी |
पांडुरंगाच्या ओढीने | धावती माळकरी ||१||
टाळमृदंगाचा ताल | नाचती थोर-अबाल |
पालखीच्या बैलांचीही | ठेक्यावरी चाल ||२||
अबीर-बुक्क्याचा टिळा | शोभिवंत भाळ |
गळी भागवतांच्या | तुळशीची माळ ||३||
सरली अठ्ठावीस | चिरंतन भक्तीस |
गंगेपरी मान | माझ्या चंद्रभागेस ||४||
लाविली भाळी | गोपीचंदी तीट |
अढळ वाळवंटी | पुंडलिकाची वीट ||५||
नाही भेदाभेद | नाही स्वार्थी मेद |
उ्च्च-नीचतेला येथे | भागवतांचा छेद ||६||
ज्ञानियाची ज्ञानेश्वरी | तुकयाची गाथा |
करूनि पारायणे | तुकविती माथा ||७||
प्रकाश राजोपाध्ये,
खोपोली

८) मुखी नाम यावे
विठ्ठल विठ्ठल । मुखी नाम यावे ।
चित्ती माझ्या व्हावे । स्थानापन्न ।।
देह नाशिवंत । नको मोह याचा ।
नको असत्याचा । मार्ग मज ।।
अहंकारातून । मज मुक्त कर ।
पाप माझे हर । पांडुरंगा ।।
पंढरीचे सुख । येथेची मिळावे ।
दान आज द्यावे । पामरास ।।
विश्व कल्याणार्थ । कार्य मज घडो ।
सर्वथा नावडो । राग लोभ ।।
नको अवगुण । नको वैरभाव ।
पैलतीर नाव । जाऊ देत ।।
दीन नको कोणी । नको कोणी राव ।
दिसो समभाव । निरंतर ।।
नदी व्हावी शुध्द । जीवन देण्यास ।
दुःख हरण्यास । पोशिंद्याचे ।।
अजू बाळ तुझा । तुज देतो हाक ।
मिटवून टाक । वैरभाव ।।
अजय रमेश चव्हाण
तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ

९) वारी…भेटीची आस…!!
पुण्यवान वारकरी
निघे जाण्या पंढरीत
वैष्णवांची गाठभेट
माऊलीच्या नगरीत..१
पायी चाल अविरत
मुखी रामकृष्ण हरी
नाही कसला आळस
जरी पावसाच्या सरी..२
ओढ अनावर होई
दर्शनाची लागे आस
दिन हाच सोनियाचा
हर एक क्षण खास..३
वारी वाटे भगवंत
स्वतःअसे उपस्थित
तोच सांभाळी भक्तांना
मनी जागवुनी प्रीत..४
विटेवरी राऊळात
दिसे जेव्हा पांडुरंग
आनंदाश्रू उभे नेत्री
सार्थ जीवन अभंग..५
सुचित्रा कुंचमवार
नवी मुंबई

१०) डोळा पाहू दे पंढरी
डोळा पाहू दे पंढरी,
विठु-रायाची नगरी… २
टाळ-विणा चिपल्या संग, २
नाचू गाऊ होऊ दंग..
अभंगाच्या तालावरी
नाचतो श्रीहरी-
नाचतो श्रीहरी
डोळा पाहू दे पंढरी
विठु-रायाची नगरी… २
चंद्रभागेच्या डोहात
पाप होई नायनाट
येऊनी जन्मावरी
पहावी ही पंढरी-
पहावी ही पंढरी
डोळा पाहू दे पंढरी,
विठु-रायाची नगरी… २
भीमाईच्या काठावरती
उभी सावळी सुंदर मूर्ती
भार अखंड, वाहे शिरावरी
सावळा श्रीहरी..
सावळा श्रीहरी..
डोळा पाहू दे पंढरी,
विठु-रायाची नगरी… २
ज्ञानोबाचे ज्ञान घेऊ
तुकोबांच्या ओव्या गाऊ
रंगून जाऊ एकनाथ आणि
नामदेवा परि.
. नामदेवा परि
डोळा पाहू दे पंढरी,
विठु-रायाची नगरी… २
माथी अबीर बुक्का लावू
पायी संताच्या लीन होऊ
चला होऊ वारकरी
रामकृष्ण हरी
बोला रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी 5
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल …
.. श्री ज्ञानदेव तुकाराम !
पंढरीनाथ…. महाराज
कि जय !!!!
अजय शिवकर
केळवणे पनवेल