उरण, विरेश मोडखरकर
योग्य ती कारवाई करण्याचे वपोनी राजेंद्र कोते यांचे आश्वासन

उरण तालुक्यात बेकायदेशीर प्रेस स्टिकर व इतर शासकीय लोगोचा वापर सर्रासकेला जात असून, अशा स्टिकरचा विनायक पर्वाना वापर बेकायदेशीर असतानाही उरण तालुक्यात अनेक छोट्या मोठ्या वाहनांवर याचा वापर केला जात आहे. अशा लोगोचा वापर करून अनेक गैरधंदे केले जात असल्याचे निदर्शनास येत असल्याने, त्यावर कारवाई करण्याची मागणी 'उरण तालुका मराठी पत्रकार संघा'ने उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्याकडे केली. यावेळी योग्य ती कारवाई करण्याचे संकेत त्यांनी पत्रकार संघाला दिले आहे.

उरण तालुक्यात अनेक वाहानावर बोगस पत्रकार, प्रेस स्टिकर लावून गैरधंदे करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे पत्रकारांचे नाव मलिन होत आहे. तसेच इतर वाहानांवर महाराष्ट्र शासन, व्हीआयपी, पोलीस यासारख्या नावांच्या लोगो असलेल्या गाड्या फिरतांना दिसत आहे. उरण हा संवेदनशील तालुका आहे. यातच अशा स्टिकर लावून सूट मिळवणाऱ्या वाहननमधून गैरसमज प्रकार सुरु असल्याचे निदर्शनास येत असताना, एखादा घातपात घडवण्यासाठी अशा वाहनांचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी अशा बोगस पाटीचा वापर करणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात येत आहे. याविषयी बोलताना उरण पोलिस निरीक्षक यांनी अर्जाद्वारे केलेल्या मागणीचा नक्कीच विचार करून बेकायदेशीर लोगो लावणार्या संबंधित गाड्यांवर व सदर व्यक्तीवर कारवाई करण्याचे संकेत दिले. यासाठी तालुक्यात विशेष मोहीम लावण्यात येईल असे आश्वासनाही यावेळी देण्यात आले आहे.

उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होत चालला आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रकल्पाना धोका संभवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. उरण परिसरात अनेक चार चाकी आणि दुचाकी गाड्यांवर प्रेस, पोलीस, राज्य शासन अशा प्रकारचे लोगो असलेले स्टिकर लावले जात आहेत. त्यामुळे अनेकदा तपास यंत्रणांना चौकशी करतांना काही कारणास्तव आपले हात आखडते घ्यावे लागत आहे. प्रेस स्टिकर्स, शासकीय लोगो उदाहरणार्थ महाराष्ट्र शासन, पोलिस, ज्यांचा या सेवेशी काडी मात्र संबंध नसतो तसेच तो गाडी फिरवणारा ही अज्ञान असताना समोर असलेल्या स्टिकर मुळे तपास यंत्रणांतील अधिकारी वर्ग कारवाई करीत नसल्याचा फायदा उठवीत असतात. अशा बहाद्दरांवर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे पत्रकार संघटनेचे म्हणणे आहे.
एखाद्याच्या गाडीवर शासकीय लोगो असल्यास त्या गाडीला तपासणे म्हणजे नोकरीवर गदा असते. त्यामुळे मग अनेकदा अशा गाड्या न तपासता सोडल्या जात आसतात. याचाच फायदा घेऊन भविष्यात एखाद्या घातपाताची घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पत्रकारांचे अथवा इतर शासकीय लोगोचे नाव खराब होऊ नये यादृष्टीने उरण तालुका मराठी पत्रकार संघाने हे पाऊल उचलत अशा अनधिकृत गाड्यांवर कारवाई व्हावी म्हणून संघाच्या वतीने मागणी करीत तशा प्रकारचे पत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांना दिले.

उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू, उपाध्यक्ष विरेश मोडखरकर, चिटणीस अजित पाटील, सदस्य प्रवीण कोळआपटे, पंकज ठाकूर, सुयोग गायकवाड आदी उपस्थित होते.