आषाढ काव्य वारी,भाग-३

|| डोळा पाहू दे पंढरी, विठुरायाची नगरी ||

कोमसाप उरण शाखेचा उपक्रम

सौजन्य- श्री अजय शिवकर (सचिव कोमसाप उरण)

विठुरायाच्या वारीमध्ये नित्य शक्य नसलेले हरिपाठ,प्रवचन किर्तनातील अमृतानुभव, अखंड नामस्मरण संस्कृती संस्कार यामुळे या जीवनाचे रहस्य समजते. अहंकार नष्ट होत, मन निर्मळ होते. जीवनात आमुलाग्र परिवर्तन होते. ज्या श्रद्धेवर जीवन चालते तो श्रद्धाभाव या वारीत विकसीत होतो. यावरच्या श्रद्धेवरच या जगाचे व्यवहार चालतात. इथे असलेल्या प्रचंड गर्दीत समोर दिसणाऱ्या प्रत्येकामध्ये विठ्ठळच दृष्टीस पडतो. प्रत्येक जिवाचे अंतरंग.. मूळ स्वरुप.. आत्मा हा पवित्र असा विठ्ठळच आहे हे इथे पटते. मग समोरच्यामध्ये विठ्ठल दिसला की आपली वागणूक बदलून हे जगच आनंदी वाटते. एकदा तुळशी माळ घातली की नित्संग होणे जमते.

अशी ही आषाढ वारी आणि विठुरायाच्या अमृतमय भक्तीने ओथंबून भरलेल्या कोमसापच्या साहित्यिकांच्या काव्यरचना…

१) पांडुरंग (अभंग)

पांडुरंग माझा |भक्तीचा भुकेला |
टाळ मृदुंगाला | आनंदला||१||

संतांचा मेळावा |त्याच्या चरणाशी |
जना उद्धारीशी | आशिर्वादे ||२||

एकोप्याची वारी| वारकरी दंग |
भजनात गुंग | भक्तगण ||३||

शाळाही पंढरी | विठ्ठल विद्यार्थी|
घडवू ज्ञानार्थी | सेवाव्रती ||४||

शाळा फुलवूनीू| संस्काराची शिधा |
करण्यास सदा | उपकारी||५||

दर्शनाची आस | मन घाली साद|
माऊलीचा ध्यास | अंतरंगी ||६||

ऋतुजा म्हणे | हिच विनवणी |
रहावी धरणी | आनंदीत ||७|

२) माझी पंढरीची आई

कुठे शोधू विठुराया
साक्ष मिळे चराचरी
गाभाऱ्यात धूप दीप
मूर्ती नाही विटेवरी •••१

विटेवर उभी माय
पाहे लेकराची वाट
नाही माऊली मंदिरी
डोळ्यातून वाह पाट•••२

बघा पालथी घातली
सारी विठूची पंढरी
कुठे शोधू विठुराया
माझ्या सावळ्या श्रीहरी •••३

निघे धुंडत धुंडत
कुठे दिसेचना हरी
वाऱ्यासवे धाव घेई
राधा कावरी बावरी •••४

वारी संगे चालताना
दूर दिसे पांडुरंग
टाळ चिपळ्यांच्या सवे
होता नाचण्यात दंग •••५

गेली शोधत शोधत
मज गवसला हरी
भक्तासंगे आनंदाने
खात होता तो भाकरी •••६

घास माझ्या मुखी देई
माझी पंढरीची आई
माझ्या डोळ्यात पाहिली
त्याने इवली मुक्ताई •••७

३) 🚩आषाढ वारी 🚩

आला आषाढाचा मास
लागे मनाला ती आस
कधी पाहिन देवास
भुक लागली डोळ्यास ||

खांद्या घेऊ वळकटी
टाळ मृदुंग हे पाठी
जाती सारे पायी पायी
माझ्या विठू रायासाठी ||

केला होता अट्टाहास
कुठे शोधु विठुराया
जना जनात दिसतो
रूप तुझे देवराया ||

चंद्रभागेच्या पाण्यात
पाप धुऊन हो जाती
भाळा वरी मी लाविन
पंढरीची हो ही माती ||

मज आठवे विठ्ठल
वारकरी पंढरीचा
ध्यानी मनी एक छंद
मुखी चाळा रे नामाचा ||

तुझी भेट झाल्या विना
चैन पडे नाही मना
दुर वरून मी आलो
माथा तुझ्याच चरणा ||

४)आषाढी एकादशी

आषाढमासी एकादशी
देव जाती शयनासी |
दिंडी निघाली भक्तगणांची
पंढरीशी ||

पंढरीचा पांडुरंग
त्याच्या भजनात दंग |
वारकरी हा करी जयघोष
रुक्मिणी श्रीरंग ||

ज्ञाना तुका एका नामा
पालखी निघे पंढरीधामा |
आनंदोत्सव हा जाहला
संत समागमा ||

वैष्णवांचा भरला मेळा
जगावेगळा असे सोहळा |
जात, धर्मभेद प्रवाद
गेला रसातळा ||

संतांचे माहेर पंढरी
आई रुक्मिणी बाप श्रीहरी |
घास भरवी अमृताचा
भक्तालागी ||

अमृत म्हणजे संतवचन
तयागुणे देहाचे जाण |
होई बावनकशी सोने
या जगती ||

५) विठ्ठल मायबाप त्रैलोक्याचा

डोळे भरून पहातच रहावे
विठ्ठल मायबाप त्रैलोक्याचा।
पंढरपुरात पावा स्नेह भक्तांचा
दरबार भरे भगवंत विठ्ठलाचा ॥

नित्य आषाढी-कार्तीकी वारी
स्नेहसंमेलन विठ्ठू भक्तांचा।
भिमा-चंद्रभागा भरून वाहे
गोतावळा विठ्ठल भक्तांचा ॥

भाग्यवंता घडो सेवा सहवास
मायबाप कृपालु पांडुरंगाचा।
करकटेवर, कर्णकुंडले मत्स्याची
तुळशीहार गळा, टीळा चंदनाचा ॥

तेजस्वी रूप गोजिरे
रंग कृष्णधवल विठ्ठलाचा।
माथी शोभून दिसे
मुकुट हिरे जडीत मोत्याचा ॥

भेट घडो सदासर्वदा
मनी भाव विठ्ठलाचा।
डोळे भरून पहातच रहावे
विठ्ठल मायबाप त्रैलोक्याचा ॥

६) विठ्ठला जीव जाहला खुळा

हात कटेवर तसा विटेवर किती युगे तू उभा
तुझिया चरणी तेज अर्पुनी नित्य उजळते प्रभा
भाव रुजवला आत फुलवला तुझ्या भक्तीचा मळा
विठ्ठला जीव जाहला खुळा !

किती स्मरावे किती जपावे नाम तुझे रे मनी
क्षणाक्षणाला हर्ष मनाला आत जागते जनी
विठ्ठल विठ्ठल नामाचा या किती लागला लळा
विठ्ठला जीव जाहला खुळा !

श्वास कोंडला ध्यास वाढला धाव अता सत्वरी
जीव तरेना धीर धरेना प्राण तळमळे उरी
उभी अंतरी तुझी पंढरी उत्सव हा आगळा
विठ्ठला जीव जाहला खुळा !

घरात तू अन चरात तू रे तूच हृदय मंदिरी
जन्म हसे वारीत फसे हा सोडव तू श्रीहरी
भेट तुझी ही थेट घडावी रंगव हा सोहळा
विठ्ठला जीव जाहला खुळा !

७) भक्तिमय वातावरण

आषाढी कार्तिकी, निघाली पंढरीची वारी
वैष्णवांचा मेळा, निनादली ती भक्ती भारी…. // धृ /

विठ्ठल विठ्ठल, गजरात स्वागत जनी
टाळ चिपळ्यांचा ,गुंजतो गोड स्वर कानी
वारकरी पंथ , तुळशी माळा गळा धारी ……. //१//

आषाढी कार्तिकी, निघाली पंढरीची वारी
वैष्णवांचा मेळा, निनादली ती भक्ती भारी…. // धृ //

रिंगण सोहळा, इंद्रायणीच्या तीरी मेळा
प्रफुल्लित सारे , भक्तगण झालेत गोळा
विठ्ठल माऊली, दर्शनाची येई उभारी ……… //२//

आषाढी कार्तिकी, निघाली पंढरीची वारी
वैष्णवांचा मेळा, निनादली ती भक्ती भारी…. // धृ //

विठ्ठल नामात ,पाय नाचता जागे शक्ती
पाहे विठूराया , पंढरीच्या वारीत भक्ती
श्रध्दा व सबुरी, लीन झाली चरणी सारी ……… //३//

आषाढी कार्तिकी, निघाली पंढरीची वारी
वैष्णवांचा मेळा, निनादली ती भक्ती भारी…. // धृ //

८) भक्तीचा सागर

विठ्ठल सावळा| मन मंदिरात||
छबी हृदयात|शोभिवंत||१||

सखा पांडुरंग|मायेचा सागर||
अंतरी घागर|नामामृत||२||

विठ्ठलाचे रूप| अंतरंगी राहो||
म्हणूनिया टाहो| फोडू आम्ही||३||

पंढरीसी आहे| माझे सुखधाम||
जीवाचा विश्राम| सावळा हा||४||

सावळा गोजिरा|माझा विठुराया||
विठुमय काया| व्हावी माझी||५||

भगवी पताका|घेऊनिया हाती||
वारकरी जाती| विठूसाठी ||६||

सचिन प्रेमाने|हरिनाम घेतो||
उजळून येतो|भक्तीरंग||७||

९) ll वारी पांडुरंगाची ll

निघाली स्वारी l पायी पंढरी ll
दर्शन व्हावा l पांडुरंगा मज वारी ll

तान भूक हरपून l स्मरण तुझे अंतरी ll दर्शन दे रे मज l या वैष्णवांच्या वारी ll

भान हर पुनी संसाराचा l जप नाम मुखी ll
आनंद मावेना गगना l होता देह सुखी ll

पहावा विठ्ठल l बोलावा विठ्ठल ll
हिच शिकवण अंतरी l मज घडावी सदा वारी ll

वेडी वाकुडी भक्ती माझी l अर्पून तुझ्या चरणी ll
सांभाळ मज या जन्मी l व्हावी आनंद वारी ll

पांडुरंग विठ्ठल l विठ्ठल वारी ll
दर्शन दे रे l दे रे मज दारी ll

१०) विठ्ठला (गझल)

केवढा गोंगाट आहे भोवताली विठ्ठला
भासतो आहे मला मी एक कैदी विठ्ठला

लोटली सारी युगे भजनात माझी रे तुझ्या
पण तुझी-माझी अजुनही भेट नाही विठ्ठला

मानली नाहीस तूही एवढ्या भक्तांमध्ये
जात ही निर्माण केली सांग कोणी विठ्ठला ?

वाहु दे माझ्या मनातून चंद्रभागा नेहमी
या शरीराची घडू दे रोज वारी विठ्ठला

तू जिथे असशील तेथे ने मलाही विठ्ठला
बघ बरे वाटेल थोडेसे तुलाही विठ्ठला

शेवटी मी आत डोकावून माझ्या पाहिले
ती तुझी मूर्ती खरे तर आत होती विठ्ठला

११) वारी पंढरीची

विठुरायाच्या भेटीची, इच्छा मनात भरली…
कोमसापच्या साथीने, वाट वारीची धरली..
रस्तोरस्ती अनवाणी, चाले वैष्णवांचा मेळा..
आस मनी माऊलीची, आळविती वेळोवेळा..
टाळ मृदंग गजरात,भक्त रंगुनीही जाती…
नसे जातीपाती मनी भाव, सर्व एकच नाचती…
गात भजने कीर्तने, नाम माऊली माऊली…
नाही शीण नाही ग्लानी, लीन होती ते
राउळी…
असा दिंडीचा हा सोहळा, अशी विठूची अपूर्वाई…
मन होऊनि निर्धास्त, धन्य झालो ठाई ठाई…

१२) वारकरी

पंढरीच्या दारी,लाखों वारकरी
नामदेव आपला,स्वागत करी

दाही दिशा तुनी, रामकृष्ण हरी
ज्ञानातुकाचोखा तोच ताल धरी

देव भेटेल कधी, प्रश्न चेह-यावरी
जनासखुकान्होपात्रा,मुक्ताईअंतरी

आपले येणजाणे,असे कधीतरी
श्रध्दा रिंगणासारखी,देव अग्रेसरी

देव दयेचा सागर, उधळे लाटांवरी
स्वर्ग आपणा भेटेल, जेथे वारकरी

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page