कर्जत, गणेश पुरवंत


जून महिन्याच्या उत्तरार्धात सुरु झालेला पाऊस मध्ये गायब झाला होता. मात्र गेल्या ११ तारखेपासून जिल्ह्यात पाऊस संततधार पडतच आहे. परिणामी आज दिनांक १४ रोजी कर्जत तालुक्यातील नेरळ कळंब राज्यमार्गावरील दहिवली तर्फे वरेडी येथील पुलावरून सकाळी ५ वाजता पाणी जाऊ लागले. खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक विभागाचे उपअभियंता संजीव वानखेडे यांनी या ठिकाणी माणसं तैनात केले होती. त्यामुळे येथे असणारे जब्बार सय्यद व शोएब सय्यद यांनी पाणी पुलावरून जायला लागल्यावर रस्ता ताबडतोब बंद केला. तर नेरळ ठाण्याचे पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी तैनात होते. पुलावरून पाणी गेल्याने नेरळ कळंब राज्यमार्ग बंद झाला त्यामुळे सुमारे ५० गावांचा संपर्क तुटला आहे. यासह तालुक्यातील कर्जत सांडशी या रस्त्यावर मोहाली बीड पुलाजवळ उल्हास नदीचे पाणी आले होते. त्यामुळे हा रस्ता देखील काही वेळ बंद झाला होता. तर तालुक्यात पूरसदृश्य स्थिती असल्याने तहसीलदार डॉ.शीतल रसाळ, महसूल नायब तहसीलदार सोपं बाचकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजीव वानखेडे यांनी कर्जत शहर उल्हास नदी परिसर, वावे, नेरळ दहिवली, माथेरान घाट, काही दरडप्रवण गावे आदी ठिकाणी भेट देऊन तालुक्यातील स्थितीचा आढावा घेतला. यासह नेरळ शहरात पाडा, मोहाचीवाडी भागात काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. तर काही भागात पाण्यात साचले होते. याठिकाणी नेरळ ग्रामपंचायतचे कर्मचारी पथक मंगेश इरमाले यांच्यासह तैनात असल्याने त्यांच्याकडून नागरिकांना मदत करण्यात येत आहे.
पावसाचा जोर कमी न झाल्यास तालुक्यात आपत्कालीन स्थिती उद्भवू शकते यामुळे तालुक्यातील प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचे तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी म्हटलं आहे.