उरण, विरेश मोडखरकर

उरण, सारडे गावाच्या ओसाड डोंगरावर दहा वर्षांच्या मेहनतीने निसर्ग बहरु लागला आहे. निसर्गप्रेमी नागेंद्र म्हात्रे यांच्या विचारातून तयार झालेल्या कोमनादेवी डोंगरावरील या मानव निर्मित निसर्गाला ‘कोमनादेवी ऑक्सिजन पार्क’ असे नावं देण्यात आले आहे. विविध फळझाडे, फुलझाडे, शोभेची झाडे याने भरभरून आलेलं निसर्ग पर्यटकांना भुरळ पाडत आहे. पावसाळी हंगाम म्हणजे पर्यटकांसाठी हे ठिकाण माहेरघर झाले आहे. यासाठी अनेकांनी मदतीचा हात सुद्धा पुढे केला आहे. यातूनच येथील सोईसुविधा देण्याचे आणि निसर्ग खुलवण्याचे काम ‘साराडे विकासमंच’ यांच्या माध्यमातून नागेंद्र म्हात्रे आणि त्यांचे सहकारी करत आहेत. येणाऱ्या पर्यटकांना आसन व्यवस्था, निसर्ग जिवंत वाटावा यासाठी येथील दगडांवर वन्यजीव चित्रित करणे, टाकाऊ वस्तूंपासुन खेळणी तयार करणे, प्रचंड प्रमाणात वृक्ष लागवड करून त्याचा संभाळ करणे, अनावश्यक तण काढणे, कचरा टाकण्यासाठी डस्टबिन लावणे, जुन्या टायरपासुन आसन व्यवस्था करणे यासारखी अनेक कामे याठीकाणी केली जात आहेत. ज्यामुळे येथील निसर्गात भर पडत असून, पर्यटकांचा ओघ वाढूलागला आहे. यातच आता या पार्कमध्ये नव्या आसन व्यवस्थेची भर पडली आहे. कै.नरेश रघुनाथ कडु यांच्या स्मरणार्थ सुमन नरेश कडु (सोनारी) यांनी केलेल्या अर्थसाहाय्यातून ‘सारडे विकास मंच’ आणि ‘सदाबहार दोस्ती ग्रुप प्रतिष्ठान’, उरण याच्या संकल्पनेतून येथे येणाऱ्या पर्यटकांना एकत्र बसून चर्चा करता यावी यासाठी विशेष आसन व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये पावसाळी पर्यटन मोठ्या प्रमाणात असते. येथील एका बांधऱ्यामुळे तयार झालेले जलकुंभ आणि उजाड माळरानावर तयार करण्यात आलेल्या निसर्गामुळे हे ठिकाण आता प्रत्येकाला आवडते झाले आहे. दहा वर्षांच्या प्रदीर्घ मेहनतीनंतर तयार झालेले हे पार्क सर्वांसाठी खुले आहे. तर हे पार्क सर्वांचेच असून, येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांनी आपण आपल्याच बागेत आल्याप्रमाणे मौज करावी. मात्र आपल्या पर्यटनातून निघणारा कचरा तेथील कचराकुंडीत टाकून सहकार्य करावे. निसर्ग निर्मिती करण्यास मोठा कालावाधी लागतो, मात्र नष्ट करण्यासाठी वेळ लागत नाही. प्रत्येकाने आपली नैतिक जावबदारी म्हणून निसर्ग आबादीत राखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तर या पावसाळयात प्रत्येक व्यक्तीने एकतरी मोठे झाड लावून त्याचे संगोपन करा आणि निसर्गाचा होणारा रह्यास थांबवा. असे आवाहन ‘सारडे विकास मंच’चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी केले आहे.