उरण, विरेश मोडखरकर
उरण तालुक्याच्या किनारी भागात मोठ्या प्रमणात धनदांडग्यांनी केलेले सी.आर.झेड. कायद्याचे उल्लंघन, तालुक्यात तहसिल कार्यालयाकडीलच यादी नुसार असलेले बेकायदा कंटेनर गोदामांचे पीक आणि उरण शहराला लागून बोरी पाखाडीत वसलेला भंगाराचा अड्डा उठविण्यात प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या सततच्या अर्थपुर्ण दुर्लक्षचा निषेध आत्ता दस्तुरखुद्द उरणचे पत्रकारच करणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यादिनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून, निषेध नोंदवीला जाणार आहे.
तालुक्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी असलेल्या तहसिलदारांना उरण तालुका मराठी पत्रकार संघाने यापुर्वीच उपरोक्त उरण तालुका मराठी पत्रकार संघाची सर्वच विषयांवर अवगत केलेले असतांना देखील संबंधितांवर कोणताही कारवाई केली जात नसल्याने, उरण तालुका मराठी पत्रकार संघाने आत्ता उपोषणास्त्र उगारले आहे. त्या संबंधीचे लेखी पत्रच उरण तालुका मराठी पत्रकार संघाने उरण तहसिलदारांना देऊन या उपोषणाची उद्घोषणा केली आहे. उरण तालुक्यात तहसिल कार्यालयाच्या वतीनं जाहिर केलेल्या यादीनुसार सुमारे ८० पेक्षा जास्त अनधिकृत कंटेनर यार्ड आणि गोदामे आहेत. या सर्व गोदामांवर थेट बंदीची कारवाई करावी अशी सुरूवाती पासूनची मागणी आहे. मात्र अशा बेकायदेशीर कंटेनर यार्ड आणि गोदामांवर प्रत्यक्ष कारवाई मात्र होतांना दिसत नाही. महसुल विभागाकडून केवळ जुजबी दंडात्मक कारवाया करून, पुन्हा संबंधितांना बेकायदेशिर गोदामे चालविण्याचा जणू अलिखित परवानाच दिला जात आहे. या बेकायदेशीर गोदामे तसेच यार्डकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसल्याने या यार्ड व गोदामांशेजारील मार्गांवर दोन लेनमध्ये अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग केली जात असल्याचे नेहमीच दिसून येत आहे. ज्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघातांनाही ही बेकायदा पार्कंग सातत्याने कारणीभूत ठरत आहे. काही गोदामांच्या परिसरात तर गावगुंडांकडून अवैधरित्या रस्त्यांवरच वाहनतळे निर्माण झाली आहेत. जी वाहतूक कोंडी आणि अपघातांना कारणीभूत ठरत आहे. त्यामुळेच मुळावरच घाव घालण्याच्या दृष्टीकोनातून ही बेकायदा कंटेनर यार्डेच बंद करण्यात यावीत अशी उरण तालुका मराठी पत्रकार संघाची सुरूवातीपासूनची मागणी राहिलेली आहे. त्याकडे तहसिल कार्यालयाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने हे आंदोलन केले जाणार आहे.
उरण तालुक्यात सी.आर.झेड. कायद्याची देखील मोठ्या प्रमाणात पायमल्ली करण्यात आलेली आहे. विशेषता: केगाव दांडा, मोरा समुद्र किनारी भागात तर मोठ्या प्रमाणात प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून, अनधिकृत भराव आणि बांधकामे करण्यात येत आहेत. राज्यातील अनेक वृत्तपत्रांमध्ये याबाबतच्या रकानेच्या रकाने भरून बातम्या देखील छापून आल्या आहेत. मात्र त्यांनतरही महसूल विभागाने या विषयावर देखील कारवाई केलेली नाही यामुळे पत्रकार संघाच्या वतीने या विषयावर देखील लेखी स्वरूपात तहसिल कार्यालयाला यापुर्वीच निवेदन दिले आहे. त्याला देखील एका महिन्याचा कालावधी व्हायला आला आहे. मात्र त्यानंतरही कोणतीही हालचाल होतांना दिसत नसल्याने उरण तालुका मराठी पत्रकार संघ या आंदोलनावर ठाम आहे.
उरणच्या बोरी पाखाडी परिसरातील शासकीय जागांवर मोठ्या प्रमाणात. परप्रांतीय अनधिकृत भंगारवाल्यांनी कब्जा केला आहे. त्या ठिकाणी त्यांनी एका मदरशाचे देखील बेकायदा काम केले आहे. या ठिकाणी काही भाड्याच्या खोल्या निर्माण झाल्या असून त्यामध्ये कोणीही येऊन अवघ्या महिना पंधरा दिवस राहून जात आहेत. अशा लोकांकडून उरण तालुक्यात काही घातपाती कारवाया देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व अनधिकृत भंगारवाल्यांना या ठिकाणावरून हाकलून लावावे अशी देखील पत्रकार संघाची जुनीच मागणी आहे. त्यावरही तहसील कार्यालय आणि नगर परिषद कार्यालय यांच्या माध्यमातून कोणतीही कारवाई केली जात नाहीय, त्यामुळेच या सर्व प्रश्नांवर आता जाहीर आंदोलनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला दिसत नाही. म्हणून उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य येत्या १५ ऑगस्ट २०२४ रोजी उरण तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा पत्रकार संघाने उरण तहसिलदारांना दिलेल्या लेखी निवेदनातून दिला आहे.