उरण, प्रतिनिधी

उरण शरातील रस्ते दिवसेंदिवस वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत आहेत. वाहतूक आणि पार्किंगवर कोणतेही नियंत्रण नसलेल्या उरण शहरामध्ये हातगाडी विक्रेत्यांवर देखील कोणतेच नियंत्रण नसल्याने, सदर हातगाडी व्यावसाईकांकडून भर रस्त्यात दुकाने मांडून मनमानी केली जात आहे. यामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी आणि छोटेमोठे अपघाताचे प्रकार नेहमीचेच झाले आहे. महत्वाचे म्हणजे यावर नगरपरिषदेचे मौन का? असा सवाल आता केला जात आहे.

उरण शहर आणि त्याअंतर्गत असणारे रस्ते मुळातच अरुंद आहेत. नगरपरिषदेने या रस्त्याचे काँक्री्टीकरण करून जेथे शक्य आहे तेथे रस्ते रुंद केले आहेत. मात्र वाढती लोकसंख्या आणि तालुक्याचे ठिकाण, त्यातच वाहनांची वाढती संख्या पाहता येथील रस्ते वाहतुकीसाठी आधीच त्रासदायक ठरत आहेत. यातच नगरपरिषदेची पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्यांवरच होणारी पार्किंग अधिक डोकेदुखी झाली आहे. आता यात हातगाडी व्यावसायीकांकडून अधिक भर टाकली जात आहे. उरणच्या रस्त्यावर आधीच अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत असताना, रस्त्याच्या दुतरफा हातगाडी व्यावासाईकांनी रस्यांतच आपले व्यवसाय थाटून मनमानी सुरु केली आहे. दोन दिवसांवर सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी सण साजरा होत असताना खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ येथील रस्त्यांवर वाढली आहे. यातच या व्यावसाईकांकडून रस्त्यामध्ये बेधडकपणे हातपाय पसरविण्यात येत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारे छोटेमोठे अपघात यात भर पडली आहे. तर एखाद्याने या व्यावसाईकांना विचारणा केली असता, त्याला उद्धट उत्तरे आणि अरेरावीची भाषा केली जात आहे. यामुळे नेहमीच वादविवाद देखील या रस्त्यांवर पाहायला मिळत आहेत. महत्वाचे म्हणजे आमच्यावर कोणतीच कारवाई होऊशकत नाही आणि होणार असेल तर आम्हाला आधीच माहिती दिली जाते, त्यामुळे आमचं कुणी काहीच करूशकत नाही, असे उदगार या व्यवसायिकांच्या तोंडून येत असल्याने याचा नक्की अर्थ काय? यावर नगरपरिषदेचं मौन का? असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत.