प्रितम म्हात्रे यांच्या विरोधात मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल

उरण, प्रतिनिधी

उरण विधानसभा निवडणूकीदरम्यान महाविकास आघाडीच्या मित्र पक्षातील प्रितम म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून, प्रचार सुरु केला आहे. मात्र या प्रचारादरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या फोटोचा वापर करत आहेत. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. या विरोधात शिवसेना (उबाठा) कडून उपसचिव सचिन परसनाईक यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज केला आहे.

   १९०-उरण विधानसभा मतदारसंघातुन महाविकास आघाडी कडून शिवसेना उबाठा गटाचे माजी आमदार मनोहर भोईर हे निवडणूकीच्या रिंगाणात उभे आहेत. तर भाजपाकडून विद्यमान आमदार महेश बालदी हे प्रतिस्पर्धी आहेत. ही लढाई दोनही उमेदवारांसाठी महत्वाची ठरणारी असताना महाविकासआघाडीच्या मित्रपक्षातील शेकापचे प्रितम म्हात्रे यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्याने ही लढाई आता त्रिकोणीय झाली आहे. यासाठी तीनही उमेदवारांनी आता आपल्या प्रचाराचा धडाका लावला आहे. मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व महाविकास आघाडीतर्फे माजीआमदार मनोहर गजानन भोईर हे अधिकृत उमेदवार असताना भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम जनार्दन म्हात्रे हे महाविकास आघाडीचे तसेच (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो आपल्या प्रचारात वापरुन मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचा दावा शिवसेना उबाठा गटाकडून करण्यात आला आहे. यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेतील परिशिष्ट १ भाग ७ आदेश क्रमांक (V) नुसार हा गंभीर गुन्हा असून, त्याद्वारे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्यावर मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केल्याप्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित देण्यात यावेत अशी तक्रार मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे शिवसेना (उबाठा) चे उपसचिव सचिन पारसनाईक यांनी अर्जाद्वारे केली आहे.
Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page