उरण, विरेश मोडखरकर
उरण तालुका नैसर्गिक दृष्ट्या सुधारूड असून, येथील तरुणांमध्ये खेळाडू वृत्ती सुद्धा नैसर्गिक आहे. ज्यामुळे येथील मुले खेळात यश संपदान करताना आपण पहात आहोत. बालेवाडी पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा जलतरण स्पर्धेत ५० मीटर फ्रीस्टाइल, ब्रेस्टस्ट्रोक आणि बॅकस्ट्रोक स्पर्धेमध्ये मोहित संदीप म्हात्रे याने तीन सुवर्ण पदके पटकावत तालुक्याचे नव्हे तर जुळ्याचे नावं उंचावले आहे. आता तो राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याचे नेतृत्व करणार आहे.
महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा जलतरण स्पर्धेचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. विविध वयोगटातील स्पर्धेत राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत राज्यातील विविध शाळेतील सुमारे ३ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यात मुंबई व रायगड विभागातर्फे उरण-करंजा नेव्हल स्टेशन चिल्ड्रन स्कूलचा विद्यार्थी मोहित संदीप म्हात्रे सहभागी झाला होता. त्याने ५० मीटर फ्री स्टाइल, ब्रेस्ट स्ट्रोक, बॅकस्ट्रोकमध्ये तीन सुवर्ण पदके पटकावली. या स्पर्धेसाठी शिक्षक प्रकाश धसाडे आणि सुप्रिया पाटील, प्रशिक्षक हितेश भोईर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे त्याने सांगितले. मोहित उरण नगर परषदेच्या तरण तलावामध्ये सराव करत असून, अत्यंतकमी सुविधा असताना देखील राष्ट्रीय पातळीवर आपला हक्क सांगणे ही फार मोठी गोष्ट आहे. त्याने आजवरच्या प्रवासात अनेक पदके मिळविली आहेत. मात्र बालेवाडी, पुणे येथे अंतरशालेय स्पर्धेमध्ये मिळविलेली तीन सुवर्ण पदके त्याला थेट राष्ट्रीय स्पर्धेकडे नेणारी ठरली असल्याने, ही तीन सुवर्ण पदके त्याच्यासाठी महत्वाची ठरली आहेत. तर मोहित आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याचे नेतृत्व करणार आहे. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.