आचारसंहिता असताना शासकीय जागेत बेकायदा बार व बियर शॉपी सुरू; उत्पादन शुल्क विभाग झोपेत

उरण, प्रतिनिधी

👆👆👆 संदर्भासाठी फोटो

राज्यात विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता सुरू असतानाही त्याचे उल्लंघन केले जात असल्याचे चित्र उरणमध्ये पहावयास मिळत असल्याने जनतेत नाराजीचा सूर निघत आहे. आचारसंहिता काळात ड्राय डे च्या दिवशीही शासकीय जागेवर बेकायदेशीर सुरू असलेल्या बार व बियर शॉपी मधून मद्याची विक्री जोरात सुरू आहे. याबाबत उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष नसल्याने ते झोपेत आहे की झोपेचे सोंग घेते अशी चर्चा जनतेत सुरू आहे.
आचारसंहिता असल्यानंतर अनेक नियम कडक केले जात असतात. त्यामुळे व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असतात. मात्र उरण परिसरात यापेक्षा उलट परिस्थिती असल्याचा अनुभव येत आहे. उरणमधील बार हे रात्रभर सुरू असतात, तर वाईन शॉप मधून गावोगावी दारू पोहच करून घरोघरी बेकायदेशीर दारूची विक्री केली जात आहे. नाक्यांनाक्यावर नियमांचे उल्लंघन करून बियर शॉपिंना परवानगी देण्यात आल्या आहेत. सिडकोच्या जागेवर बेकायदेशीर कोणतीही परवानगी न घेता ढाबे उभारून दारूची विक्री सुरू असते.
तसेच सर्वसामान्य जनतेला बार अथवा बियर शॉपीला परवानगी मिळवायची असेल तर अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असते, मात्र धनधाडग्याकडून खिरापत घेऊन परवानगी दिली असल्याचे उघड होते. उरण परिसरात शासकीय जागेवर कोणतीही परवानगी न घेता बार व बियर शॉपी सुरू असल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे सदरचे अनधिकृत बार व बियर शॉपी हे ज्या दिवशी ड्राय डे असतो त्या दिवशीही सुरू असल्याची धक्कादायक माहिती बारमधील कामगारांनी पत्रकारांना दिली. तसेच ज्या परवानगी आहेत त्याचे फ्रेम लावणे बंधनकारक असतानाही कोणतीही कागदपत्रे याठिकाणी नसून मालक बाहेर असल्याचे उत्तर कामगार वर्ग देत आहे.
यावरून हा सर्व प्रकार बेकायदेशीर असून बार व बियर शॉपी साठी बोगस कागदपत्रे सादर करून अथवा उत्पादन शुल्क अधिकारी वर्गाच्या संगनमताने हे सुरू असल्याचा संशय ही उरणच्या जनतेकडून व्यक्त केला जात आहे. तरी उत्पादन शुल्क विभागाने अशा बेकायदेशीर बार व बियर शॉपी यांच्यावर त्वरित कारवाई करून गुन्हे दाखल करावेत अन्यथा त्या विरोधात सामाजिक संघटना जनहित याचिका दाखल करणार असल्याचे समजते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page