उरणच्या ११ वर्षीय मयंक म्हात्रेने पुन्हा एकदा रचला इतिहास

उरण, विरेश मोडखरकर

   उरण, करंजा येथील जलतरणपटू मयंक म्हात्रे याने घारापुरी बंदर ते करंजा जेट्टी हे सागरी १८ किमी अंतर निर्धारीत वेळेपेक्षा कमी वेळेत पोहून पार करत, पुन्हा एकदा नवा इतिहास घडविला आहे. मयंकने ३ डिसेंबर २०२३ रोजी धरमतर ते करंजा हा प्रवाह पोहून पार केला होता. ज्यामुळे तो हा प्रवाह पोहून जाणारा पहिला जलतरणपटू ठरला होता. तर यावेळी घारापुरी ते करंजा जेट्टी हा प्रवाह पोहून जाणारा मयंक पहिला जलतरणपटू ठरला असून, त्याने या निमित्ताने नवा इतिहास रचला असल्याचे त्याच्या प्रशिक्षकांकडून सांगण्यात येतं आहे. 
  उरणच्या सेंट मेरीज कॉन्व्हेट शाळेतील सहाव्या इयत्तामध्ये शिकणारा मयंक हा उत्कृष्ट जळतरणपटू असून, समुद्रीय जलतरण हा त्याचा आवडता प्रकार आहे. मयंकने आजवर अनेक स्पर्धामधून यश संपदान केले आहे. मात्र समुद्रीय जलतरण हे त्याला मोठे यश आणि प्रसिद्धी देणारे ठरले आहे. समुद्र किनारी लागून असणाऱ्या करंजा, कोंढारीपाडा येथे राहणाऱ्या या ११ वर्षीय चिमुकल्याने आज नवा विक्रम केला आहे. मंगळवार दि.३ डिसेंबरच्या मध्यरात्री १:०४ मिनिटांनी मयंकने जगविख्यात घारापुरी बंदर येथून समुद्राच्या लाटांना आव्हान देत करंजा जेट्टी गाठली आणि पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित केला. सागरी १८ किमी अंतर त्याने निर्धारीत वेळेपेक्षा अर्धातास आधी पोहून पूर्ण केले आहे. हा प्रवाह पोहून जाण्यासाठी ६ तासाचा अवधी अपेक्षित होता. तर मयंकने हे अंतर ५ तास २९ मिनिटात पोहून पार करत सर्वांनाच चकित केले आहे. त्याने केलेल्या या प्रयत्नाने घारापुरी ते करंजा हा प्रवाह पोहून पार करणारा तो पहिला जलतरणपटू ठरला आहे. याच प्रमाणे मागील वर्षी याच दिवशी म्हणजे ३ डिसेंबर २०२४ रोजी त्याने धरमतर ते करंजा हे १८ किमी अंतर पोहून पार करत तो प्रवाह पोहून पार करणारा पहिला जलतरणपटू म्हणून आपले नावं त्या प्रवाहांवर कोरले आहे. त्यामुळे रायगड, मुंबई विभागातील समुद्रीय जलप्रवाहातील दोन प्रवाहांवर मयंकने आपले नावं कायमस्वरूपी कोरले आहे. 

मयंकने केलेल्या विक्रमनंतर अनेकांनी शुभेच्छा देण्यासाठी करंजा जेट्टी येथे गर्दी केली होती. तर यावेळी मयंकचा सत्कार शेकापचे युवा नेतृत्व प्रीतमदादा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष राजू कोळी, संघटनेचे निरीक्षक शैलेश सिंग, समाजसेवक सचिन डाऊर, नितीनभाऊ कोळी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

मयंकने आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आपले आई वाडील, मार्गदर्शक किशोर पाटील, प्रशिक्षक हितेश भोईर यांना दिले आहे. तर उरण तालुका हौशी जलतरण संघटनेचे सचिव सुनील पाटील, शिक्षक मनोहर टेमकर, जलतरणपटू जयदीप सिंग, आर्यन मोडखरकर, वेदांत पाटील, रुद्राक्षी टेमकर, आर्य पाटील यांचे सहकार्य त्याच्या या विक्रमादरम्यान त्याला लाभले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page