उरण, आसावरी घरत
मुंबईतील टाकसाळमधील निवृत्त आर्टिस्ट इन्ग्रेव्हर वसंत गावंड यांचे उरण येथील राहत्या घरी निधन झाले आहे. यामुळे, कला क्षेत्रातील कलाकारांमध्ये आपला ठसा उमटविणारा कलाकार हरपल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
उरण तालुक्यातील आवरे गावचे रहिवासी असलेले वसंत गावंड यांनी मुंबईतील जेजे स्कुल ऑफ आर्ट्समधून इन्ग्रेव्हर आर्टिस्ट म्हणून शिक्षण घेतले होते. त्यानंतर, १९७१ साली त्यांनी मुंबईतील नाणे बनविणाऱ्या टाकसाळमध्ये रुजू झाले होते. तेव्हापासून २००२ पर्यंत सुमारे ३१ वर्षांच्या कालावधीत त्यांनी अनेक नाण्यांचे डिझान्स तयार केली आहेत. यामध्ये, वसंत गावंड यांनी छत्रपती शिवाजी महाराज, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, इंडीरा गांधी, जयप्रकाश नारायण, राजीव गांधी अशा महापुरूषांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाणी तयार करण्यात आली आहेत. यावेळी, स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव, कॉमन वेल्थ गेम्स, भाताचे कणीस अशा विविध घटनांवर नाणी तयार करण्यात आली असून इंदिरा गांधी यांच्या कॉईनसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वसंत गावंड (८२ वर्षे) यांची प्रकृती बिघडल्याने २ डिसेंबर रोजी त्यांचे उरण येथील राहत्या घरी निधन झाले आहे. यामुळे, उरण तालुक्यातील ज्येष्ठ कलाकार हरपल्याने संपूर्ण कला क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.