उरण, प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालय महालन विभाग फुंडे येथे बँकिंग करिअर मार्गदर्शन आणि आर्थिक साक्षरता याविषयी एक दिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात सुरू असलेले विविध व त्यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असल्याचे नमूद केले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात, सेबी या नामांकित संस्थेच्या मार्गदर्शक सुषमा दास यांनी सिक्युरिटी मार्केटमधील गुंतवणूक आणि नोकरीच्या संधींविषयी सखोल माहिती दिली. त्यांनी आर्थिक फसवणुकीपासून बचाव कसा करता येईल, यावरही मार्गदर्शन केले. याच सत्रात बजाज फिनसर्व्हचे प्रमुख प्रशिक्षक विनोद प्रजापती यांनी विमा आणि फायनान्स क्षेत्रातील नोकरीसाठी आवश्यक कौशल्यांवर सविस्तर चर्चा केली. दुसऱ्या सत्रात आयसीआयसीआय बँकेचे भारतीय पश्चिम विभागाचे डेप्युटी जनरल मॅनेजर निरंजन मोहिते यांनी बँकिंग क्षेत्रातील बदलांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रात गेल्या सात-आठ वर्षांत कशाप्रकारे संधी उपलब्ध झाल्या असल्याचे उदाहरण दिले आणि आधुनिक बँकिंग प्रणाली स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य विकसित करावे, असे आवाहन केले.
कार्यशाळेत 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेचे समन्वयक प्रा. भूषण ठाकूर आणि प्रा. प्रांजल भोईर होते. कार्यक्रमात डॉ. सोनावले, प्रा. दिव्या ठाकूर, प्रा. रेणू सरोज, प्रा. आरती पाटील, आणि प्रा. तन्वी कोळी यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिक्षिता म्हात्रे व प्रा. प्रियंका ठाकूर यांनी केले, तर प्रा. पंकज भोये यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यशाळेने विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरता आणि बँकिंग क्षेत्रातील रोजगारसंधींबाबत प्रेरणा आणि दिली त्यासाठी आवश्यक त्या तयारीचे मार्गदर्शन लाभले