पोलीस यंत्रणाचा कानाडोळा
उरण, विरेश मोडखरकर
तालुक्यात यात्रा, क्रिकेट व इतर खेळांचा हंगाम सुरू झाल्याने चक्रीच्या जुगाराचे डाव रंगण्यास सुरुवात झाली आहे. तरी या चक्रीच्या जुगारांना पोलिसांनी परवानगी देऊ नये अशी मागणी महिला वर्गाकडून जोर धरू लागली आहे.
उरण तालुक्यातील गावोगावच्या यात्रांचा हंगाम सुरू होणार आहे. त्याच बरोबर नाईट क्रिकेट व इतर खेळांचे सामने ही मोठया प्रमाणात तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी संपन्न होताना दिसतात. यावेळी चक्रीच्या जुगाराचा डाव मोठया प्रमाणात सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.
दोन दिवसांवर उरण शहरातील दत्त जयंतीची यात्रा संपन्न होणार आहे. यावेळी शहरातील काही ठिकाणी चक्रीच्या जुगाराचा डाव रंगणार आहे. त्यानंतर यात्रा व क्रिकेट सामने सुरू होतील. त्यावेळीही चक्रीचा जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असतो. सदर चक्रीचा जुगार हा रात्रीच्या वेळेस कुठल्या तरी कोपऱ्यात सुरू असतो. त्यावेळी हे जुगारवाले आम्हांला परवानगी दिली असल्याचे खोटेनाटे सांगून वेळ मारून नेतात. तरी उरणमधील तीनही पोलीस ठाण्याने आशा चक्रीच्या जुगारांना परवानगी देऊ नये अशी मागणी महिला वर्गांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे केली आहे.