उरण, विरेश मोडखरकर
शैक्षणिक शिक्षण आणि सामाजिक सेवा यामध्ये दुवा निर्माण करण्याच्या उद्देशाने फुंडे, उरण येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या आरोग्य केंद्र समितीने, कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. या भेटीत ग्रामीण आरोग्य केंद्राच्या कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेत विद्यार्थ्यांना आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाच्या बाबी समजावून सांगण्यात आल्या.
विद्यार्थ्यांनी आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाशी संवाद साधला. त्यांनी लसीकरण मोहिमा, मातृत्व व बाल संगोपन, आणि सर्वसामान्य आजारांवरील उपचार यांसारख्या सेवा कशा दिल्या जातात हे समजून घेतले. या भेटीबाबत महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर म्हणाले, “अशा प्रकारच्या भेटी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. ग्रामीण भागातील आरोग्यसेवेच्या महत्त्वाची जाणीव त्यांना होते.” या भेटी चे आयोजन प्रा. पंकज भोये यांनी केले, त्यात प्रा. देवेंद्र कांबळे आणि प्रा. विशाखा पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.
महाविद्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र भविष्यात आरोग्य जागरूकता कार्यक्रम राबवण्यासाठी आणि सामूहिक आरोग्य शिबिरे आयोजित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करतील .