उरण, विरेश मोडखरकर

गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाचे आगमन. संपूर्ण देशभर हा सण उत्साहात साजरा केला जातो. उरण तालुक्यातही नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. यानिमित्त जेष्ठ नागरिक संघटनेतर्फे आयोजित शोभायात्रेत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला.

गेल्या २२ वर्षांपासून जेष्ठ नागरिक संघटना गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा काढून हिंदू नववर्षाचे स्वागत करत आहे. यंदा या शोभायात्रेत सकल हिंदू समाजाच्या सहभागामुळे यात्रा अधिक भव्य स्वरूपात पार पडली. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या शोभायात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी ☝️☝️☝️क्लिक करा
शोभायात्रा उरण येथील पेन्शनर्स पार्क येथून सुरू होऊन विमाला म्हणजेच भीमाळे तालावाला प्रदक्षिणा घालून पुन्हा पेन्शनर्स पार्क येथे येऊन विसर्जित झाली. यात्रेच्या आकर्षणांमध्ये मर्दानी खेळ, महिलांची बाईक रॅली, ढोलताशा पथक, एन. आय. हायस्कूलचे लेझीम पथक, वारकरी संप्रदायाचे भजन पथक, जेष्ठ नागरिक संघटना, विविध महिला संघटना, सामाजिक संस्था तसेच उरण तालुका मराठी पत्रकार संघ यांचा समावेश होता.

याशिवाय, पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या बालगोपाळांनीही या शोभायात्रेत उत्साहाने सहभाग घेतला आणि नववर्षाच्या स्वागताला अनोखा रंग भरला. संपूर्ण शहरात या शोभायात्रेमुळे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.