उरण प्रतिनिधी, मनोज ठाकूर

भक्तिमय वातावरणात अभिषेक, कीर्तन आणि महाप्रसाद
6 एप्रिल 2025 रोजी उरण तालुक्यातील कंठवली वाडीवर पहिल्यांदाच रामनवमी जन्मोत्सवाचे मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात आयोजन करण्यात आले. वनवासी कल्याण आश्रम व विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. कंठवली वाडीतील ग्रामस्थांनी विशेष उत्साहाने पुढाकार घेत भक्तिमय वातावरणात श्रीराम जन्मोत्सव साजरा केला.

सकाळी विधिवत पूजेनंतर श्रीरामांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. संपूर्ण परिसर मंत्रोच्चारांनी आणि भक्तिरसाने भारलेला होता. नंतर, सकाळी अकरा वाजता पनवेलहून आलेल्या कीर्तनकार ह. भ. प. सौ. सुनीता ताई खरे यांचे सुश्राव्य व भक्तिभावपूर्ण कीर्तन झाले. त्यांनी श्रीरामांचे गुणगान करत भक्तांचे मन जिंकले. त्यांच्या कीर्तनास उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. कीर्तनास हार्मोनियमवर साथ देण्यासाठी वैशालीताई कुलकर्णी होत्या, तर तबल्यावर समीर सोमण यांनी सुंदर साथ दिली. कार्यक्रमानंतर श्रीरामांची आरती झाली. सर्वांनी दर्शन घेऊन भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी पनवेलहून आलेल्या कीर्तनकार सुनीता ताई खरे यांच्यासोबतच सौ. सुलक्षणा टिळक, तसेच विश्व हिंदू परिषद उरणचे कार्यकर्ते प्रशांत पुगावकर, श्रीकांत कुंभार, अतुल सिंह, अक्षय सोनवलकर, अनिल साळुंखे यांची उपस्थिती लाभली. वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते दीपक गोरे, वामन काका म्हात्रे, मीरा पाटील, मयुरी जगताप, योगेश जगताप यांनी देखील कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. कंठवली गावातील ग्रामस्थांनी मोठ्या निष्ठेने आणि मेहनतीने संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले.
हा कार्यक्रम केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकतेचे आणि संस्कृतीच्या जपणुकीचे प्रतीक ठरला. ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे कंठवली वाडीवरील पहिलाच रामनवमी उत्सव संस्मरणीय ठरला.