उरण, प्रतिनिधी

मैसूर येथील कृष्णराज सागर जलाशयाच्या लाटांवर महाराष्ट्राच्या जलक्रीडा संघाने आपल्या कौशल्य, चिकाटी आणि शिस्तीच्या बळावर राष्ट्रीय यश मिळवले. यॅचिंग असोसिएशन ऑफ इंडिया (YAI) यांच्या वतीने आयोजित “युथ अँड ज्युनियर मल्टिक्लास चॅम्पियनशिप २०२५” मध्ये देशभरातून ३०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. मात्र या शर्यतीत महाराष्ट्राच्या जलक्रीडा संघाने आपले वर्चस्व ठसठशीतपणे अधोरेखित केले.

अत्यंत शिस्ताबद्ध आणि उत्तम नियोजनातून आणि “रॉयल मैसूर सेलिंग क्लब” यांच्या सहकार्यातून २० ते २५ जून या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या सेलिंग, सर्फीग या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचे नेतृत्व नाव्या काकू हिने उत्तमरीत्या केले. तिने १५ वर्षांखालील मुलींच्या गटातील “IQ Foil” या नवोन्मेषी आणि वेगवान जलक्रीडा प्रकारात जबरदस्त नियंत्रण आणि वेग दाखवत सुवर्ण पदक आपल्या नावावर केले. हे तिच्या मेहनतीचे आणि तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाचे उत्तम उदाहरण ठरले. मुलांच्या गटात, मोहित म्हात्रे याने “Techno 293D” प्रकारात दमदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले. त्याच्या खेळातील आत्मविश्वास आणि समतोल यामुळे त्याने राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख अधिक भक्कम केली. यशाची ही साखळी येथेच थांबली नाही.१९ वर्षांखालील मुलींच्या गटात रुद्राक्षी मनोहर टेमकर हिने “Raceboard” स्पर्धेत जोरदार स्पर्धा करत सुवर्ण पदक जिंकले, तर साई संतोष पाटील याने मुलांच्या गटात रेसबोर्ड प्रकारात रौप्य पदक मिळवले. १५ वर्षांखालील मुलींच्या “Techno 293D” प्रकारातील चुरशीच्या स्पर्धेत प्रियांशी मयूर पाटील हिने आपली लढवय्यी वृत्ती दाखवत रौप्य पदक मिळवले. तसेच, “Optimist” प्रकारात वृत्तिका संदीप म्हात्रे हिने कांस्य पदकासह सर्वात तरुण महिला स्पर्धक म्हणून विशेष गौरव प्राप्त केला. या उल्लेखनीय यशाचे श्रेय महाराष्ट्र याचिकेच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमांना, कौशल्याभिमुख पद्धतीला आणि युवा विकासावर दिलेल्या भराला जाते. खेळाडूंनी केवळ पदके जिंकून दिली नाहीत, तर त्यांनी जलक्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव उज्वल केले आहे.

स्पर्धेनंतर महाराष्ट्राचा संघ नवी प्रेरणा, आत्मविश्वास आणि आंतरराष्ट्रीय संधींच्या दिशेने वाटचाल करत राज्यात परतला. राज्याच्या क्रीडाविश्वात हा क्षण ऐतिहासिक ठरत आहे.