उरण प्रतिनिधी, मनोज ठाकूर

वनवासी कल्याण आश्रम, उरण यांच्या वतीने चिरनेर परिसरातील अक्कादेवी आदिवासी वाडी, केळ्याचा माळ व विंधणे वाडी येथील शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले. तसेच विंधणे येथे फ्रेंड्सऑफ नेचर या सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था, चिरनेर उरण यांना वन्यप्राण्यांसाठी प्राथमिक उपचार किट वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.

वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून उरण तालुक्यातील दुर्गम ठिकाणी असणाऱ्या वाडी, वस्त्यांवरील बांधवांच्या गरजा ओळखून त्यांच्यासाठी मदतीचे कार्य केले जातं आहे. या उपक्रमाअंतर्गत रविवार दि. २९ जुलै रोजी तालुक्यातील अक्कादेवी वाडीतील २०, केळ्याचा माळ वाडीतील ३० आणि विंधणे वाडीतील ५५ अशा एकूण १०५ विद्यार्थ्यांना वह्या, शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी वनवासी कल्याण आश्रम, उरणचे अध्यक्ष मनोज ठाकूर यांनी शिक्षणात कोणतीही अडचण आल्यास आश्रमाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असेआवाहां यावेळी येथील विद्यार्थ्यांना केले आहे. आवश्यक ती मदत वनवासी कल्याण आश्रम नक्की करेल असे आश्वासनही दिले आहे. वनवासी कल्याण आश्रम फक्त वनवासी बांधवांसाठीच काम करत नाही तर निसर्गाचे संवर्धन आणि आदिवासी आवास टिकून राहण्यासाठीही कार्य करत आहे. याच दृष्टिकोनातून तालुक्यातील “फ्रेंड्स ऑफ नेचर” या सर्पमित्र आणि संवर्धन निसर्ग संस्थेला प्राणी व पक्ष्यांवरील उपचारांसाठी प्रथमोपचार किट देण्यात आले. यावेळी संस्थेकडून विद्यार्थ्यांना विषारी व बिनविषारी सापांची ओळख कशी करायची, सर्पदंश झाल्यास कोणते उपाय करावेत तसेच काय करूनये आणि रुग्णालयात तातडीने कसे जावे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी पक्षी अभ्यासक निकेतन ठाकूर यांनी चिरनेर परिसरातील जंगलात वन्यजीव, पक्षी आणि कीटक संशोधनासाठी येणाऱ्या अभ्यासकांस स्थानिक नागरिक मार्गदर्शक म्हणून मदत करू शकतात आणि त्यातून रोजगाराची संधी मिळू शकते याबाबत माहिती दिली.

कार्यक्रमास जाणीव सामाजिक संस्था, उलवा चे अध्यक्ष सुनील ठाकूर, वनवासी कल्याण आश्रमाचे कुलाबा जिल्हा उपाध्यक्ष उदयजी टिळक, प्रांत महिला सहप्रमुख सौ. सुनंदा कातकरी, जिल्हा शिक्षण आयाम सहप्रमुख मीरा पाटील, बालसंस्कार वर्गाचे दीपक गोरे, वामन म्हात्रे, वर्षा अधिकारी, साधना पागी, बेबीताई कातकरी तसेच मित मेडिकल विंधणे चे मालक बळीराम पेणकर हे उपस्थित होते.