उरण, प्रतिनिधी
राजकीय वास येत असल्याचा राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर यांचा आरोप
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते मोठा गाजावाजा करीत उरण रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र आज सायंकाळी ४ वाजल्यापासून उरणमधील ४ रेल्वे स्थानकावरील वीज गायब झाली आहे. यामुळे प्रवाशांना चाचपडत प्रवास करण्याची वेळ आली आहे. सलग ६ तास वीज गायब झाली आहे, आज निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असल्याने ही वीज जाणूनबुजून तर घालविण्यात आली नाही ना असा आरोप राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी 👆👆👆क्लिक करा
विधानसभा निवडणुकीच्या निमित्त भाजपचे उमेदवार महेश बालदी यांच्या प्रचारासाठी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्री उरणमध्ये आले होते. त्यावेळी रेल्वे मंत्री यांनी लवकरच रेल्वे फेऱ्या व सीएसटी व ठाणे सुरू करू असे आश्वासन दिले होते. परंतु हे आश्वासन देऊन दोन दिवस होत नाही तोच उरणमधील आज सायंकाळी ४ वाजल्यापासून ४ रेल्वे स्थानकांवरील वीज गायब झाली आहे. रात्री १० वाजले तरी शेवटची रेल्वे येऊनही विजेचा पत्ता नाही. हे वृत्त समजताच घटनास्थळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी भेट देऊन पाहणी केली. उद्या निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने आजची रात्र महत्वाची मानली जात आहे. त्यामुळे आर्थिक रसद आणण्यासाठी तर ही वीज घालविण्यात आली असल्याचा आरोप यानिमित्ताने भावना घाणेकर यांनी केला आहे. त्यांनी घटनास्थळावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिसाळ व इतर अधिकारी वर्गाना फोन करून कल्पना देऊनही घटनास्थळी कोणी अधिकारी न आल्याने यामागे राजकीय वास असल्याचा आरोप घाणेकर यांनी केला असल्याने तशा प्रकारचा संशय प्रवासी वर्गानी व्यक्त केला आहे. मात्र याचा त्रास प्रवाशी वर्गाना विशेषतः महिला वर्गाना सहन करावा लागत असल्याने हेच का अच्छे दिन अशी संतप्त प्रतिक्रिया महिला वर्गाकडून व्यक्त होत आहे. मात्र याबाबत रेल्वे प्रशासनाच्या अधिकारी वर्गाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता घटनास्थळी कोणीच नसल्याने संपर्क होऊ शकला नाही. तरी याची चौकशी करण्याची मागणी भावना घाणेकर यांनी केली.