अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई, धाब्यांवर केव्हा?

उरण, विरेश मोडखरकर

उरण तालुका मराठी पत्रकार संघाचा प्रशासनाला सवाल

उरण मधील अनधिकृत ढाब्यांना शासकीय यंत्रणेचे पाठबळ; कारवाईची मागणी

  मुंबई घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातामध्ये निष्पाप जीवांचे बळी गेल्यानंतर राज्यभरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र पुण्यात नशेमध्ये घडलेल्या अपघातामध्ये दोघांचा जीव गेला असताना, बेकायदेशीर पब आणि बारवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. मात्र  उरणमधील अनधिकृत रित्या सुरु असणाऱ्या ढाब्यांवरील मद्य विक्रीकडे शासकीय यंत्रणेचे पाठबळ असल्यानेच ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याने  अशा ढाब्यांवर कारवाई केव्हा होणार? असा सवाल उरण तालुका मराठी पत्रकार संघाने उपस्थित केला आहे. 
  राज्यभरातील बेकायदेशीर होर्डिंग पोलीस बंदोबस्तमध्ये काढण्यास सुरुवात झाली आहे. खेदाची गोष्ट एवढीच आहे, कि ही कारवाई होण्यासाठी १७ लोकांना आपला जीव गमवावा लागला. राजरोसपणे बेकायदा उभे असणारे हे होर्डिंग शासकीय अधिकारी, पोलीस, मंत्री, लोकनेते, स्थानिक पुढरी यांनी अनेकदा पाहिले असतील. मात्र त्यावर कुणीही आधी आवाज उठवला नाही अथवा कारवाई केली नाही. मात्र अचानक आलेल्या वादळ परिस्थितीमध्ये घाटकोपर येथील एक होर्डिंग कोसळून त्यात १७ जणांना जीव गमवावा लागतो. त्यानंतर यंत्रणा सक्रिय होते. याला दुर्दैव म्हणावे कि शासकीय यंत्रनांची उदासिनता? आज १७ निष्पाप बळी गेल्यानंतर यंत्रणा जागी झाली, आणि राज्यभरातील होर्डिंगवर कारवाई सुरु झाली. अशाचप्रकारे पुण्यामध्ये देखील नशेमध्ये धूत अल्पवीन वाहन चालकाने दोन जीवांचा बळी घेतला. यांनंतर अपघाताचे पडसाद संपूर्ण देशभरातून उमटू लागले. मग यातील दोषी व्यक्तींवर कारवाई सुरु झाली. व्यवसायाने बिल्डर असणाऱ्या अग्रवाल कुटुंबाला याचा मोठा फटका बसला आहे. तर पोलीस, राज्य उत्पादान शुल्क यांच्यासह शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. या प्रकरणातील पब चालक आणि पबवर देखील कारवाई झाली आहे. तर राज्यातील बेकायदा अथवा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पब, बार, रेस्टोरंट यावर देखील कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती आहे. मात्र राज्यभरातील रस्त्यांच्या कडेला उभे असणारे बेकायदेशीर ढाबे राजरोसपणे सुरु आहेत. या ढाब्यांना कोणतेच नियम लागू होतं नसल्याप्रमाणे खुलेआम अनाधुंदी कारभार सुरु असतो. महत्वाचे म्हणजे उरणमध्ये अनधिकृत ढाब्यांवरून उघडपणे मद्य आणि इतर नशिले पदार्थ विक्री केले जात आहेत. तर काही ढाब्यांवरून मद्य बाहेरून आणून पिण्याची मुभा दिली जाते. 

पुणे अपघातामधील आरोपी हा एक धनाडय बापाचा लेक आणि अपघातामधील वाहन कोट्यावधी रुपयांचं असल्याने या अपघाताचा गावगवा मोठा झाला. मात्र आजवर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बेकायदेशीर ढाब्यावर मद्य प्राशन करून, नशेमध्ये अनेक निष्पाप जीवाचा बळी घेणाऱ्यांची संख्या उरणमध्ये जास्त असूनही ती कधीच मोजली गेली नाही. अशा बेकायदेशीर धाब्यांवरून रोज मोठी माया कामावण्याच्या नादामध्ये किती बळी जात आहेत, याचाही विचार होणे गरजेचे असून, अशा बेकायदेशीर ढाब्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे. याबाबत कायदेशीर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे, अध्यक्ष घनशाम कडू यांनी म्हटले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page