अलिबाग प्रतिनिधी, अमूलकुमार जैन

महाड तालुक्यातील मोहोत गावामध्ये एका व्यक्तीने परसबागेत गांजाची लागवड केल्याचे पोलिसांना समजले. यावरून या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून गांजाची शेती उध्वस्त केली आहे. तर गांजा लागवड करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
माहिती मिळताच छापा टाकून कारवाई
याबाबत एमआयडीसी पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार महाड तालुक्यातील मोहोत या गावातील श्याम सिताराम भिसे, रा. भिसे वाडी वय ६१ याने राहत्या घराशेजारील परसबागेत अमली पदार्थाच्या गांजा या पिकाची लागवड केल्याची माहिती पोलिस शिपाई निखिल बाबासो कांबळे यांना मिळाली असता, महाड एम.आय.डी.सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या पथकाने छापा टाकून पाच ते सहा फूट उंचीच्या, हिरव्या रंगाची पाने असलेली उग्र वासाची ओलसर सोळा झाडे वजन एकूण वजन २ किलो ४८ ग्रॅम, यामध्ये निव्वळ गांजाचे वजन १ किलो ९८८ ग्रॅम मिळून ४९ हजार ७०० सातशे रुपये किमतीच्या मुद्देमाला सकट गांजाचे पिक उध्वस्त केले आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २०( ब), २० (ब)( २)प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उप निरीक्षक संजय मुंढे हे करीत आहेत.

टपऱ्यांनवरील गांजाच्या विक्रीवर कारवाई का नाही?
गांजाची शेती करणाऱ्या वर कारवाई झाली मात्र. महाड तालुक्यात ज्या ज्या अनधिकृत टपऱ्यांवर गुटख्याच्या नावाखाली सर्रासपणे गांजा विक्री केली जाते त्यांच्यावर काय कारवाई करणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. महाड तालुक्यातील विन्हेरे विभागात तसेच खाडीपट्ट्यात व दादली पुलाजवळील व नातेखिंडीतील आणि महाड एमआयडीसीतील अनेक टपऱ्यांवर गांजा विक्री होत असताना देखील पोलिसांनी याबाबत का कारवाई केली नाही असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.