उरण प्रतिनिधी, वैशाली कडू
हजारो एकर जमीन घेतली, पण एक हॉस्पिटलही, सांस्कृतिक केंद्र दिलं नाही
१५ वर्षांपासून भूमिपूजनाचा ढोंग…
सिडकोनं उरण तालुक्यातील भूमिपुत्रांच्या जमिनी कवडीमोल दराने घेतल्या. लाखो रुपये परस्पर कमावले. घरे, उद्योग, हॉटेल्स, टॉवर्स यांचा डोलारा उभा केला. पण ज्यांच्या जमिनीवर हा विकासाचा ढोल पिटला जातोय, त्या उरणकरांना आजही साधं हॉस्पिटल नाही, सांस्कृतिक केंद्र नाही, ही बाब केवळ लाजीरवाणीच नाही, तर अपमानकारक आहे!

हॉस्पिटल फक्त भूमिपूजनापुरतेच!
२०१० साली तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या उपस्थितीत उरणमध्ये सुसज्ज रुग्णालयासाठी भूमिपूजन पार पडलं. नंतर २०२४ ऑगस्ट मध्ये पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच हॉस्पिटलचं भूमिपूजन केलं! एवढं सगळं करूनही १५ वर्षांनंतर त्या जागेवर एक वीटही रचलेली नाही! हा प्रकार म्हणजे जनतेच्या डोळ्यात अक्षरशः धूळफेक करण्यासारखा आहे.
जमिनी गेल्या, विकास गेला पण भूमिपुत्र मात्र फाट्यावर!
सिडकोने उरण परिसरात हजारो एकर जमीन अधिग्रहित केली. ‘विकास’ या नावाखाली ती जमीन कोट्यवधी रुपयांना विकली. तिथे मल्टिनॅशनल कंपन्यांचे प्रकल्प आले. मग स्थानिक भूमिपुत्रांच्या वाट्याला काय? ना आरोग्य सुविधा, ना सामाजिक केंद्र, ना शिक्षणसंस्था… फक्त आश्वासनंच!
“माणसं मरतात, भूमिपूजन जगतं!”

गोपाळ पाटील, अध्यक्ष – उरण उत्कर्ष समिती यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना सडेतोड निवेदन पाठवून हा सर्व प्रकार थेट उघडकीस आणला आहे. त्यांच्या मते, “माणसं हॉस्पिटलअभावी मरत असताना, सिडको फक्त भूमिपूजनाचं ड्रामा करत आहे. उरणच्या भूमिपुत्रांना मूर्ख समजण्याची ही शेवटची वेळ!”
पाटील यांच्या निवेदनातील प्रमुख मुद्दे आहेत. त्यामध्ये उरणमध्ये तातडीने एक सुसज्ज हॉस्पिटल उभारावे. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अद्ययावत भवन उभारले जावे. दोन्ही प्रकल्पांसाठी सिडकोने जागा, निधी व मंजुरी तात्काळ द्यावी. उरणमधील युवा, शेतकरी, महिला, वयोवृद्ध असे सर्वच वर्ग या प्रश्नावर संतप्त आहेत. “जर सिडकोने ही मागणी ऐकून घेतली नाही, तर आंदोलन उभे राहील ,” असा इशाराही उरण उत्कर्ष समितीने दिला आहे.

राजकीय उपस्थिती फक्त भूमिपूजनापुरती!
राज्यकर्ते निवडणुकीच्या वेळेस उरणमध्ये हेलिकॉप्टरने येतात. भूमिपूजन करतात. भाषणात ‘विकास’चा पाऊस पाडतात. आणि नंतर गायब होतात! आता भूमिपुत्रांचा संयम संपला आहे. ते प्रश्न विचारणार, उत्तरं मागणार, आणि जर गरज पडलीच तर रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी सज्ज आहे.