उरण, प्रतिनिधी

उपजीविकेसाठी कायमस्वरूपी व्यावसाईक दुकाने द्यावी
जागतिक ख्यातीच्या घारापुरी बेटावरील नागरिकांच्या उपाजीविकेचे साधन म्हणजे, येथील एकमेव पर्यक आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना विविध शोभेच्या वस्तू, रंगीत माळा, भेटवस्तू तसेच खाद्यपदार्थ विक्री करून गाठीला दोन पैसे कमावण्याचा प्रयत्न येथील स्थानिक करत आहे. मात्र महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि पुरातत्व विभाग यांच्या नियमानुसार स्थानिकाच्या उपाजीविकेचे साधन असणाऱ्या अनेकदा दुकानांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. यासाठी येथील नागरिकांनी आपल्याला उपजीविकेच कायमस्वरूपी साधन मिळावं यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांना साकडं घातलं आहे.
जागतिक दर्जाच्या बंदराप्रमाणेच गावांचा विकास होईल
खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती उरण येथे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत घारापुरी यांचे वतीने ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्या मांदण्यात आल्या. यामध्ये घारापुरी हे जागतिक दर्जाचे बेट असल्याने येथील ग्रामस्थ पर्यातानावर आधारीत कटलरी दुकाने लाऊन उपजीविका चालवतात. मात्र महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या कडून वारंवार दुकाने हटवण्यासाठी नोटिसा देऊन कारवाईचा बडगा उगारतात. ज्यामुळे येथील व्यावसाईकांना भीतीच्या सावटखाली व्यवसाय करावा लागतं आहे. यासाठी ग्रामस्थांना कायमस्वरूपी दुकाने मिळाल्यास सदरचा प्रश्न निकाली निघेल. तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या मार्फत घारापुरी बेटाचा विकास आराखडा तयार केला असून त्याप्रमाणे विकास कामे सुरू आहेत. मात्र भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने सदरच्या कामांना मंजुरी मिळत नसल्याने कामे स्थगित आहेत. ही मंजुरी मिळाल्यास बेटाचा विकास होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे घारापुरी येथे विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्यास जागतिक दर्जाच्या बंदराप्रमाणेच येथील गावांचा विकास देखील होईल. अशा आशयाचे निवेदन यावेळी घारापुरी ग्रामस्थांनी खासदार श्रीरंग बारणे यांना दिले आहे. यावेळी तहसीलदार डॉ. उद्धव कदम, गट विकास अधिकारी वठारकार सर्व विभागाचे अधिकारी, सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकूर, सदस्या अरुणा घरत, हेमाली म्हात्रे, नीता ठाकूर, भारती पांचाळ उपस्थित होते.
दुकाने हटविणार नसल्याची खासदारांनी दिली हमी
मान्सूनमध्ये येथील पर्यटन बंद असते. त्यामुळे उर्वरित आठ महिने येथील नागरिक छोट्या दुकानांच्या माध्यमातून वर्षभराची बेगमी करत असतो. यामुळे ही दुकाने वाचावी अशी प्रमुख मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तर शासनाकडून विकास कामांसाठी मोठा निधी याआधीही दिला आहे आणि यापुढेही देणार. तसेच येथील कटलरी दुकानदारांची दुकाने हटविणार नाही अशी हमी खासदार बारणे यांनी ग्रामस्थ्यांना दिली आहे.