उरण, प्रतिनिधी

उरण तालुक्यातील बोरी गावामध्ये मोबाईल टॉवर उभारणीला जोरदार विरोध होत असून, स्थानिक रहिवाशांनी आरोग्याला होणाऱ्या संभाव्य धोक्याचा मुद्दा पुढे करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. भर वस्तीमध्ये उभारला जाणारा हा मोबाईल टॉवर नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करू शकतो, असा दावा करत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मते, टॉवरमधून उत्सर्जित होणारे किरणोत्सर्ग (Radiation) हे दीर्घकाळ आरोग्यावर विपरीत परिणाम करतात. लहान मुले, गरोदर महिला, वृद्ध नागरिक यांच्यावर त्याचा विशेषतः वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या टॉवरच्या उभारणीला गावकऱ्यांनी ठाम विरोध दर्शविला आहे. या संदर्भात नागरिकांनी उरण नगरपरिषद, उरण पोलीस ठाणे तसेच तहसील कार्यालय यांच्याकडे तक्रारी करून टॉवर बंद करण्याची मागणी केली होती. मात्र अनेक दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

“टॉवर सुरु करू देणार नाही!” — ग्रामस्थांचा निर्धार
गावकरी स्पष्टपणे सांगत आहेत की, “आमच्या आरोग्याशी खेळ करायला आम्ही परवानगी देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत हा टॉवर कार्यरत होऊ देणार नाही. प्रशासनाने वेळेवर दखल न घेतल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू.” या पार्श्वभूमीवर गावात वातावरण चांगलेच तापले आहे. काही नागरिकांनी टॉवरजवळ एकत्र येत निषेध नोंदवला असून, जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं, तर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
प्रशासनाकडून अद्याप मौन
या प्रकरणात उरण नगरपरिषद किंवा संबंधित यंत्रणांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनात आणखी अस्वस्थता पसरली आहे.