उरण : नवी मुंबईला जोडणाऱ्या उरण ते खारकोपर लोकलचा मार्ग १५ एप्रिलला सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सोमवारी (३ एप्रिल)ला या मार्गावर पुन्हा एकदा चाचणी होणार आहे. यावेळी उरण ते खारकोपर मार्गावरील सुविधा,अडचणी यांचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहीती रेल्वेच्या सुत्रांकडून मिळाली आहे. या पूर्वी ३१ मार्चला हा मार्ग सुरू होणार असल्याचे वृत्त पसरले होते. मात्र हा मार्ग सुरू न झाल्याने उरण मधील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यातच या मार्गावरील अनेक स्थानकांची कामे अपूर्ण आहेत. मार्ग सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाल्याने सध्या या कामांना वेग आला आहे.
उरण स्टेशन परिसरात सध्या रेल्वेचा भोंगा वाजू लागल्याने उरण ते खारकोपर हा लोकल रेल्वे मार्ग सुरू होण्याची प्रचंड उत्सुकता आणि उत्कंठा उरणकारांना लागली आहे. ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी इच्छा उरण मधील प्रवासी व नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र उरण ते खारकोपर मार्गावरील रेल्वे रूळ आणि त्याची तपासणी रेल्वेच्या सुरक्षा विभागाने चाचण्या केल्या आहेत. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी तयार असल्याचा अहवाल ही रेल्वेला विभागाला सादर केला आहे. परंतु आज पर्यंत या मार्गावरील उरण, द्रोणागिरी,न्हावा- शेवा,रांजणपाडा व गव्हाण या रेल्वे स्थानकांची कामे अपूर्ण आहेत. यामध्ये उरण,द्रोणागिरी,न्हावा शेवा व रांजणपाडा येथील पार्किंगची तसेच येथील प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठीच्या मार्गाची कामे अपूर्ण आहेत. यामध्ये द्रोणागिरी स्थानकांच्या अंडर ग्राऊंडची कामे अपूर्ण आहेत.