मुंबई: राज्यातील शाळांना 2 मे ते 11 जून पर्यंत उन्हाळी सुट्या जाहीर करण्यात आल्या आहे. तर 12 जून पासून पुन्हा शाळा खुल्या होणार आहेत. विदर्भात मात्र सर्व शाळा 26 जूनपर्यंत बंद असणार आहेत. याबाबतच पत्रक शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी लागू होणार आहे. तर राज्यातील नवीन शैक्षणिक वर्ष 12 जून पासून सुरू होणार आहे. विदर्भातील उन्हाळ्याची तीव्रता पाहता वैदर्भीय विभागातील नव शैक्षणिक वर्ष जून महिन्याच्या चौथ्या सोमवारी म्हणजेच 26 जून पासून सुरू होणार आहे. इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 30 एप्रिल रोजी किंवा त्यानंतरच्या सुट्टी काळात जाहीर करता येणार आहे. निकाल विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्याची जवाबदारी शाळांची असणार आहे.