उरण (प्रतिनिधी): झपाट्याने विकासाकडे धाव घेत असलेल्या उरण तालुक्यामध्ये सध्या अवैद्य पार्किंगचे लोण उठले आहे. ठिकठिकाणी तीवरांची कत्तल करून, त्यावर मातिचा भराव केला जात आहे. तर या भरावावर अवैद्य पार्किंग आणि त्याअंतर्गत इतर धंद्यानाही उधाण आले आहे. मात्र सिडको प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून, अशा अवैद्य धंद्यावर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.
उरण तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने राज्य महामार्ग 54 आणि राष्ट्रीय महामार्ग 4 ब ची निर्मिती करण्यात आळी आहे. या मार्गमुळे तालुक्याला इतर मोठ्या शहरांशी सहजासाहाजी जोडता आले आहे. तर जेएनपिटी बंदरातून होणाऱ्या व्यापारालाही मोठी चालना मिळाली आहे. जेएनपिटी बंदर आणि त्या आधारीत इतर प्रकल्पांना अनुसरून येथील व्यवस्था करण्यात येत आहे. या व्यवस्थेमधून पर्यावरण आणि समुद्रिय संपत्ती आबादीत रहावी यासाठी खादी किनार्यावरील भूखंड तीवरांसाठी राखीव ठेवले आहेत. मात्र या भूखंडांना सध्या अवैद्य व्यवसायाची वाळवी लागली आहे. महत्वाचे म्हणजे सिडको प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या अशा भूखंडावर बेधडकपणे मातीचे भाराव करून त्यावर अवैद्य पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे. तर या पार्किंगच्या माध्यमातून oil चोरी, गुटखा विक्री, गांजा विक्री तसेच जुगाराचे अड्डे जोरात सुरु असल्याची माहिती मिळत आहे. एखाद्या स्थानिक गरीब कुटुंबाने उदरनिर्वाहासाठी टपरी बांधल्यास सिडकोची त्या टपरिवार तात्काळ कारवाई होते. मात्र याप्रकारे अवैद्य मातीचे भरावं करून त्यावर बेधडक पार्किंग आणि इतर अवैद्य व्यवसायातून करणाऱ्यांवर कोणतीच कारवाई होत नसल्याने, सिडकोबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.