सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांनी जनतेस केले आवाहन
अलिबाग (जिमाका) :- सध्या राज्यामध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यानुषंगाने दि. 29 मार्च 2023 रोजी सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली कोविड प्रतिबंधक उपाययोजनांच्या तयारीसाठी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये संचालक, सहसंचालक, उपसंचालक तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये कोविडच्या अनुषंगाने राज्य व जिल्हा स्तरावर रुग्णालयाची तयारी, मॉकड्रीलबाबतच्या सूचना आणि औषधसाठा व इतर साधन सामग्रीबाबत तयारीचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीतील सविस्तर चर्चेनंतर सर्व जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाला पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे जनतेलाही विविध मुद्दयांबाबत आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य यंत्रणांनी रुग्णालय स्तरावर आणि कार्यक्षेत्रात भेटीदरम्यान आरोग्य कर्मचारी यांनी ILI /SARI सारख्या आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करणे,ILI म्हणजे सौम्य ताप , सर्दी, खोकला, अंगदुखी, घशामध्ये खवखवणे, SARI म्हणजे तीव्र ताप, श्वसनास त्रास होणे, धाप लागणे, तीव्र स्वरूपाचा खोखला लागणे इ., कोविड Genomic sequencing साठी RTPCR Positive रुग्णांचे नमुने नियमित पाठवावेत, कोविडच्या तयारीबाबत मॉकड्रिल दिनांक १० आणि ११ एप्रिल रोजी सर्व संस्थांमध्ये घ्यावयाचे आहे, Contact tracing च्या मार्गदर्शक सूचना आणि घरी विलगीकरणांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, रुग्णालयात औषधी व साहित्य उपलब्ध राहतील याची खातरजमा करावी, प्रत्येक जिल्हयात नियंत्रण कक्ष सुरु करण्यात यावे, अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे जनतेने गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी विशेषतः सह-व्याधी असणाऱ्या व्यक्ती आणि वृद्ध यांनी जाणे टाळावे, डॉक्टर, पॅरामेडिक्स आणि रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी आरोग्य संस्थांमध्ये / रुग्णालयात मास्कचा वापर करावा, गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी मास्क वापरणे, शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल / टिश्यू वापरणे, हाताची स्वच्छता राखणे / वारंवार हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळणे, सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घशामध्ये खवखवणे, श्वसनास त्रास होणे अशी लक्षणे आढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन लवकर कोविड चाचणी करावी, श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असल्यास वैयक्तिक संपर्क मर्यादित करणे, कोविड उपचार व निदानाची सोय सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे, सर्व व्यक्तींनी कोविड बूस्टर डोस लसीकरण करावे, सौम्य लक्षणे असल्यास स्वतः खात्री करून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार व कोविड चाचणी करावी, लक्षणे सौम्य असली तरी कोविडचा प्रसार इतरांना होऊ नये म्हणून कार्यालयात, शाळा, महाविद्यालये, ठिकाणी/गर्दीच्या ठिकाणी/ सार्वजनिक ठिकाणी न जाता पूर्ण बरे होईपर्यंत स्वतः घरी अलगीकरण करावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार व कोविड चाचणी करावी, या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे.
तरी रायगड जिल्ह्यातील नागरिकांनीही घाबरु नये, काळजी घ्यावी, शासन-प्रशासन आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास सदैव सज्ज आहे. मात्र नागरिकांनी शासन -प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील,पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी केले आहे.
*कोविडचे प्रमाण वाढत आहे-घाबरू नका…पण काळजी घ्या*
*सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांनी जनतेस केले आवाहन*