संपूर्ण जग डिजिटल युगामध्ये प्रवेश करत असताना, आजच्या पत्रकारितेने देखील डिजिटल वाटचाल सुरु केली आहे. बदलत्या काळानुसार माध्यमेही बदलत गेली आहेत. आचार्य बाळशास्त्री जाभेकर यांनी इ. स. 1832 मध्ये देशातील ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरु करून, पत्रकारितेचा पाया रोवला. त्यानंतर पत्रकारितेच्या माध्यमातून वृत्तपत्रांनी देश स्वातंत्र्याची चळवळ उभी केली. आज देशभरातून विविध भाषांमधून अनेक वृत्तपत्र प्रकाशीत होत आहेत. तर आधुनिक काळामध्ये दुरदर्शन या शासकीय वाहिनीसोबतच अनेक खाजगी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून जलदगतीने वृत्त प्रसारण पत्रकारिता प्रचलित झाली. यामुळे एका रिमोटच्या माध्यमातून विविध वृत्तवाहिन्यांमधून देश, विदेशातील घटना चलचित्रणासह पाहता येऊ लागल्या.
तर आत्ताच्या डिजिटल युगामध्ये ‘अँड्रॉइड’ तंत्रज्ञानाने आपल्या हातामधील मोबाईल फोनच्या माध्यमातून जगातील घडामोडी जाणून घेता येते. यातूनच ‘युट्युब न्यूज’ आणि ‘न्यूज पोर्टल’ म्हणजेच डिजिटल बातमीपत्र सर्वांच्या पसंतीचे बनले आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसरापासुन जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंतच्या घडामोडी मोबाईल फोनचे एक बटण दाबून पहायला मिळत आहेत. आज याच तंत्रज्ञानाचा वापर करून, आपल्या परिसरातील घडामोडी प्रत्येकापर्यंत पोहचाव्या यासाठी ” नवराज्य ” या पोर्टलची सुरुवात करत आहोत. गेली 21 वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये कार्य केल्यानंतर, बदलत्या माध्यमानुसार, बदलत्या पत्रकारीतेची कास धरत मुख्य संपादक पत्रकार विरेश मधुकर मोडखरकर यांच्या संकल्पनेतून हे पोर्टल सुरु होत आहे. हे पोर्टल वाचकांच्या पसंतीत उतरण्यासाठी “नवराज्य” परिवार नक्कीच प्रयत्न करेल.