अलिबाग (प्रतिनिधी ):- तत्कालीन जिल्हाधिकारी आणि सध्याचे विभागीय कोकण आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून अलिबाग येथील चेंढरे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या “जिल्हा स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका” या नवीन वास्तूचे उद्घाटन दि.3 एप्रिल 2023 रोजी पालकमंत्री उदय सामंत आणि रायगड किल्ला जतन, संवर्धन व विकास आराखडा प्राधिकरणचे अध्यक्ष श्री.संभाजी शाहू, छत्रपती, यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी आमदार महेंद्र दळवी, कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मुख्याधिकारी अंगाई साळुंखे आदि मान्यवर उपस्थितीत होते.
यावेळी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी पुस्तकांचा संच भेट म्हणून विनामूल्य देण्यात आला.
तत्कालीन जिल्हाधिकारी आणि सध्याचे विभागीय कोकण आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यात सर्व तालुक्यांमधून जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता “गरुडझेप” स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात आले होते. या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांना प्रत्यक्ष मार्गदर्शन, ऑनलाईन मार्गदर्शन तसेच स्पर्धा परीक्षेची पुस्तके विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली होती.
याचेच पुढचे पाऊल म्हणून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी अभ्यास केंद्र मिळावे, या हेतूने जिल्ह्यातील विविध तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र व अभ्यासिका उभे करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.