गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि परिसरातील प्रकल्पांसाठी शासन प्रयत्नशील—पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा
अलिबाग,दि.06(जिमाका):- किल्ले रायगडासह इतर गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि परिसरात साकारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीसारख्या प्रकल्पांसाठी शासन प्रयत्नशील असून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे केले.
किल्ले रायगड येथे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार धैर्यशील पाटील, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, महाड प्रातांधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशिद, सरकार्यवाहक पांडूरंग बलकवडे, कार्यवाह सुधीर थोरात आणि स्थानिक उत्सव समिती, महाडचे अध्यक्ष त्रिंबक पुरोहित, कार्यवाह संतोष कदम उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी शिवसमाधी आणि जगदीश्वर मंदिर दीपवंदना, पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या मुलाखती (राजसभेत), शाहीर किरणसिंग सुरज राऊळ जळगाव यांचा ही रात्र शाहिरांची हा शाहिरी कार्यक्रम तसेच श्री जगदिश्वर मंदिरात हरिजागर असे कार्यक्रम झाले.
तर दुसऱ्या दिवशी श्री जगदिश्वर पूजा, श्री हनुमान जन्मोत्सव, राजदरबार येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा,श्री शिवप्रतिमा पूजन करण्यात आले.
सैन्यदलातील अधिकारी आणि सरदार घराणे सन्मान, गडरोहण स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा, श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार वितरण, शिवरायमुद्रा स्मरणिका प्रकाशन, शिवप्रतिमेची पालखीतून राजदरबार ते श्री शिवसमाधी मिरवणूक , श्री शिछत्रपतींना मानवंदना, सर्व शिवभक्त व रायगड जिल्हा पोलीस, शिवभक्तांना होळीचा माळ येथे महाप्रसादाचे वितरण असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठ्यांच्या समाधीस्थळांचे अभ्यासक श्री.प्रविण भोसले यांना श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार तर सैन्यदल अधिकारी ले.जनरल सुदर्शन हसबनीस (निवृत्त)(PVSM,VSM,ADC), शूर सरदार हरजीराजे महाडीक यांचे वंशज यांचा मंत्री महोदयांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 343 व्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर आज हजारो शिवभक्तांनी अभिवादन केले.