बीड ( प्रतिनिधी ): सलग तीन वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकरी कर्ज, नापिकी, नैराश्याला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत आहे. त्यामुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या काही थांबता थांबत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. धक्कादायक म्हणजे, गेल्या तीन महिन्यात मराठवाड्यात तब्बल 214 शेतकऱ्यांनी स्वतःच जीवन संपवून घेतलं आहे. तर मराठवाड्यात दररोज दोन शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे. विशेष सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात होत असून, गेल्या 90 दिवसांत बीडमध्ये 65 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे.
आधी अतिवृष्टी आणि आता त्यानंतर अवकाळी पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे अक्षरशः पिकं वाहून गेली. काही ठिकाणी तर शेतातील माती देखील वाहून गेली. त्यामुळे झालेल्या या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यात सरकारची मदत अजून मिळाली नाही. त्यामुळे घेतलेलं कर्ज कसे फेडायचं, बँकेकडून सतत सुरु असलेला तगादा, पैश्यासाठी सावकाराकडून होणारी मागणी आणि त्यात आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने कुटुंब चालवण्याची चिंता असल्याने शेतकरी आत्महत्या करत आहे. या नवीन वर्षात गेल्या तीन महिन्यांत 214 शेतकरी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांची ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.