अलिबाग, अमूलकुमार जैन
लोकांच्या कामासाठी सरकार काम करत आहे. सातबारा, रेशन कार्ड यासह इतर दाखले लोकांना मिळणे सोपे व्हावे यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन तहसीलदार विक्रम पाटील यांनी अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय चेंढरे येथे शासन आपल्या दारी योजने अंतर्गत आयोजित कार्यक्रमात केले.महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी योजने अंतर्गत, महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे तहसील कार्यालय आणि एकात्मिक बाल विकास कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

सर्वसामान्य लोकांना जागेवर न्याय मिळाला पाहिजे असे सांगून तहसीलदार विक्रम पाटील म्हणाले, सर्वसामान्य माणसाला त्याच्या नियमित असणाऱ्या कामासाठी हेलपाटे घालायला लागू नयेत अशा पद्धतीचे काम आपल्याला करायचे आहे. सामान्य माणसाच्या दरात शासन गेलं पाहिजे. शासन हे सर्व सामान्य जनतेसाठी आहे. अशा प्रकारचे लोकाभिमूख काम अलिबाग तालुक्यात निश्चितच केले जाईल. सर्व सामान्य जनतेसाठी राबवण्यात येणारे असे उपक्रम प्राधान्याने राबवण्यात यावेत, यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. या शिबिराच्या माध्यमातून नक्कीच जनतेचे प्रश्न सोडवले जातील, असे तहसीलदार विक्रम पाटील यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमास प्रत्येक विभागाच्या कार्यालय प्रमुखांनी आपल्या विभागाकडून दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांची माहिती देण्यात आली. आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांनी शेवटच्या नागरिकां पर्यंत पोहोचावा यासाठी योग्य नियोजन करून शासनाचा विविध योजनांचा लाभ नागरिकांना देण्याचे कार्य यशस्वीपणे पूर्ण करण्याचे आवाहन कार्यक्रमाचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी केले.
या शिबिरात उत्पन्न दाखले – ३५,वय अधिवास दाखले १८,नॉन क्रिमीलेयर -१०,जातीचे दाखले – ७,संजय गांधी निराधार योजना -९, असे ६९ दाखले आणि शिधापत्रिका १५ वाटप करण्यात आले. जनतेच्या सोयीसाठी शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासन आपल्या दारी योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
सदर कार्यक्रमास अलिबाग तालुक्यातील २०० पेक्षा जास्त अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांनी उपस्थित होत्या. शासनाच्या वतीने विविध कार्यालयातील कर्मचारी यांनी आपल्या विभागाचे स्टॉल लावून शासनाच्या योजनांची माहिती दिली. या मध्ये महसूल विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना आणि शिधापत्रिका विभागाचा स्टॉल लावण्यात आला होता. आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड – अलिबाग आणि कृषी विभाग यांनी आपले स्टॉल लावले होते.