शासकीय सेतू केंद्राची सेवा ठप्प; विद्यार्थ्यांची ससेहोलपट

उरण, वैशाली कडू

गेली ३ ते ४ दिवसांपासून शासकीय सेतू केंद्रातील इंटरनेट सेवा बंद पडली आहे. यामुळे प्रवेशासाठी शासकीय दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालक वर्गाची ससेहोलपट होताना दिसत आहे. तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रवेशासाठी मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे.

    नुकतेच दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विविध शासकीय दाखल्यांची गरज लागत असते. सदर दाखले ऑनलाइन मिळत असल्याने दाखले मिळविण्यासाठी शासकीय सेतू केंद्रात अर्ज अनेक अर्ज दाखल केले आहेत. परंतु गेली ३ ते ४ दिवसांपासून उरणमधील नव्हेतर राज्यातील सर्वच शासकीय सेतू केंद्रावरील इंटरनेट सेवा खंडीत झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शासकीय दाखले मिळण्यास विलंब होत असल्याचे दिसते. उरणमधील सेतू केंद्रात दररोज १०० च्या वरती अर्ज येत असल्याची माहिती सेतू केंद्र चालक विलास पाटील यांनी दिली.         
    यामुळे पुढील प्रवेशासाठी मुदतीत अर्ज दाखल केला नाहीतर आपले वर्षे वाया जाते की काय अशी भीती विद्यार्थी व पालक वर्गाना वाटत आहे.  यासंदर्भात उरण तहसिल कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनीही शासकीय सेतू केंद्राची सेवा सर्वच ठिकाणी बंद असल्याची माहिती दिली. 
 शासकीय सेतू केंद्र इंटरनेट सेवेअभावी बंद पडले असल्याने विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यास विलंब होत आहे. याचा सारासार विचार करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन वर्षे वाया जाऊ नये यासाठी प्रवेशासाठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने शासकीय यंत्रणेकडे  केली आहे.
Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page