अलिबाग:- विशेष प्रतिनिधी
किल्ल्यातच होत आहेत नियमबाह्य बांधकामे
स्थानिकांच्या जमीनी खरेदी करून काही स्थानिक मंडळी व धनदांडगे रेवदंडा आगरकोट किल्लात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण क्षेत्रात प्रतिबंध्द व निर्बधीत क्षेत्राचे उल्लघंन करून नियमबाहय नवीन बांधकामे ऐतिहासिक अवशेष, व वास्तूची तोडफोड करीत करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केंद्रीय पुरातत्व विभागास अनेकांनी अनेकदा केलेल्या तक्रार अर्जात केला आहे. मात्र या तक्रार अर्जास केराची टोपली केद्रीय पुरातत्व विभागाकडून दाखविली जात असल्याने संप्तत प्रतिक्रिया ग्रामस्थ व इतिहासप्रेमी मंडळी व्यक्त करत आहेत.
ग्रामस्थांच्या तक्रारींना केराची टोपली
भारतीय पुरातन सर्वेक्षणच्या नियम 32 अन्वये प्राचीन स्मारके, पुरातत्वीय स्थळे, आणि अवशेष अधिनियम 1959 अन्वये संरक्षीत स्मारकांच्या सीमेपासून 100 मीटर पर्यंत व त्यापलिकडे 200 मीटर पर्यंतच्या जागा खणणे व बांधकाम करणे यासाठी प्रतिबंध्द आणि निर्बधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले असून तसे फलक रेवदंडा आगरकोट किल्ला परिसरात ठिकठिकाणी केंद्रीय पुरातत्व विभागाचे वतीने लावण्यात आले आहे. मात्र तरीही प्रतिबंध्द व निर्बधीत क्षेत्राचे उल्लघंन करून नियमबाहय बांधकामे काही स्थानिक व धनदांडगे येथील स्थानिकांच्या जमिनीची खरेदी करून करत आहेत. त्यासंदर्भात ग्रामस्थांचे वतीने केंद्रीय पुरातत्व विभागास केलेल्या तक्रारीस चक्क केराची टोपली दाखविली जात असून बांधकामे बिनधोकपणे पुर्ण केली गेली आहेत तसेच काही बांधकामे सुरू असल्याचे तक्रारी अर्जात म्हटले गेले आहे. ग्रामस्थांनी केंद्रीय पुरातत्व विभागास केलेल्या तक्रारीत बांधकामे करताना प्रतिबंध्द व निर्बधीत क्षेत्राचे उल्लघंन करून ऐतिहासिक अवशेष व वास्तूची तोडफोड केली जात असल्याचा आरोप वारंवार केल्या गेलेल्या तक्रार अर्जात केला आहे. केंद्रीय पुरातत्व विभाग अनेक ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीस गांर्भियाने घेत नसून ऐतिहासिक अवशेष व वास्तू नामशेष केले जात असल्याने संतापजनक प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थ व इतिहासप्रेमी मंडळी व्यक्त करीत आहेत.
रेवदंडा आगरकोट किल्ला परिसरातील बांधकामे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या आदेश फलकानुसार नियमबाहय होत असल्याचे निर्दशनास येते, मात्र केंद्रीय पुरातत्व विभाग अनेक ग्रामस्थांनी केलेल्या तक्रार अर्जाची दखल का घेतली जात नाही ? हा प्रश्न उपस्थित केला जात असून ही बांधकामे थांबविण्याऐवजी बिनधोकपणे पुर्ण केली गेली जात आहेत, त्यानुसार या बांधकामाच्या माध्यमातून संबधीत मोठी आर्थिक लुट करत असल्याचा आरोप केला जात आहे. या बांधकामासाठी लाखो रूपयांचा मंलिदा व मोठी भरलेली पाकिटे सरकवली जात असल्याचा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. नित्याने ऐतिहासिक किल्लाचे संरक्षण व स्वच्छता आदी उपक्रम राबवित प्रसिध्दी घेत असलेल्या इतिहास प्रेमी मंडळी व संघटना सुध्दा या बांधकामाकडे का दुर्लक्ष करत आहेत असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.
रेवदंडा आगरकोट किल्ला परिसरात अनेक बांधकामे केली गेली व अनेक बांधकामे सुरू आहेत, या संदर्भात ग्रामस्थ तक्रार अर्ज केंद्रीय पुरातत्व खात्याकडे नित्याने अनेकांनी केली आहेत. मात्र केंद्रीय पुरातत्व विभाग कोणतीच कारवाई करत नसल्याचे दिसून येते, अनेकांना नोटीसी पाठविण्यात आल्याचे येथील महसुल विभागाकडून सांगितले जाते परंतू नोटीसी व्यक्तीरिक्त ठोस कारवाई करण्यात येत नसल्याचे बांधकामे निर्धास्तपणे पुर्ण केली जात आहेत असेच चित्र दिसते.
केंद्रीय पुरातत्व विभाग व संबधीत यांनी केलेल्या दुर्लक्षतेने रेवदंडा आगरकोट किल्ला परिसरात नवीनवीन बांधकामे संबधीताच्या आशिर्वादाने सुरू आहेत, व पुढे होतील. या बांधकामाने आगरकोट किल्ला परिसरातील ऐतिहासिक अवशेष व वास्तू निश्चित नष्ट होण्याचे मार्गावर आहेत. एकीकडे शासन व पुरातत्व विभाग प्राचीन व ऐतिहासिक वास्तू व अवशेष यांचे जतन करण्यासाठी विविध उपाय योजना करत आहे मात्र ग्रामस्थ व इतिहासप्रेमी मंडळीच्या तक्रार अर्जास केराची टोपली दाखविली जात असून या तक्रार अर्जाच्या दुर्लक्षतेने या पुढे ऐतिहासिक वास्तू व अवशेष नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत.