आजवर दहा हाजार प्राण वाचवणाऱ्या संस्थेला “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार द्यावा

विरेश मोडखरकर

बोरघाट बस अपघाताची भयाण कहाणी

   शनिवारी पाहाटे बोरघाटामध्ये एका खाजगी बसला अपघात झाला. ही बस जवळपास 200 ते 250 फूट खोल दरीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला तर 28 जण गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर मदतकार्य सुरू करताना दरीमध्ये जे चित्र होते ते फार विदारक आणि भयाण होते. 

माहिती मिळताच बचाव कार्याला सुरुवात

   मुंबई गोरेगाव येथील दोन वादन ग्रुप डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूकी मध्ये वादन करून, मध्यरात्री 2 वाजता मुंबईसाठी एका खाजगी बसमधून परतीच्या प्रवासाला लागले. बोरघाटामध्ये बस आली आणि अवघड वळणावर तीव्र उताराच्या ठिकाणी चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बसमधील प्रवाशांचे डोळे उघडण्याआधीच बस दोनशे ते अडीचशे फूट खोल दरीमध्ये कोसळली. अपघातामधून बचावलेल्या एका मुलाने आपल्या मोबाईलमधून पोलीस कंट्रोलरूमशी संपर्क केला. याबाबतची माहिती "अपघातग्रस्तांच्या मदतीला' या संस्थेचे सर्वेसर्वा गुरुनाथ साठेलकर यांना मिळताच बाचावकार्याला सुरुवात झाली. 

हॉरर सिनेमाप्रमाणे दारीतील चित्र होते.

  गुरुनाथ साठेलकर आपल्या 7-8 सहकाऱयांना सोबत घेऊन अपघात ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ठिकाण मिळाले नाही. पुन्हा ज्या अपघातग्रस्त मुलाशी संपर्क करून लाईव्ह लोकेशन टाकण्यास सांगितले. नेटवर्क असल्याने त्याने पाठवलेले लोकेशन प्राप्त झाले. दोन महिन्यांपूर्वी एका दुचाकीस्वाराचा याच ठिकाणावरून अपघात झाला होता, आणि गुरुनाथ साठेलकर यांच्याच टीमने त्यावेळेस रेस्क्यू ऑपरेशन केले होते. यामुळे खाली दरीमध्ये उतरण्याचा कठीण परंतु योग्य मार्ग माहिती होता. लागलीच साठेलकर यांनी दरीमध्ये उतरण्याचा निर्णय घेऊन उतरण्यास सुरुवात केली. या अपघातामध्ये वाचलेल्या प्रवाशांना दरीमधून बाहेर येण्याचा मार्ग माहीत नव्हता. मात्र गुरुनाथ आणि त्यांचे सहकारी खाली उतरत असताना त्यांच्या टॉर्च लाईटच्या उजेडाच्या दिशेने काही जखमी पुढे येत होते. एका घटकेला बचाव टीम आणि जखमी प्रवाशी समोरासमोर आले तो क्षण एखाद्या हॉरर सिनेमातील सिन प्रमाणे असल्याचे गुरुनाथ यांनी सांगितले. जखमी "झोम्बि" सिनेमातील झोम्बि प्रमाणे अडखळत, लंगडत, पडत, ओरडत, विव्हळत त्यांच्या जवळ मदतीच्या अपेक्षेने येत होते. 

प्रत्येक दगडावर जखमी प्रवाशांचा सडा पडला होता.

   कुट्ट अंधार, दरीमधील उष्मा, फुटलेल्या काचा, पत्रे, वादनासाठी सोबत असलेल्या ढोल साहित्याचे तुटलेले तुकडे, बसचा झालेला चक्काचूर या सर्व परिस्थितीमध्ये प्रत्येक दगडावर बसमधील जखमी प्रवाशांचा पडलेला सडा, हृदय हेलावून टाकणारे होते. याहीपेक्षा जखमींचं विव्हळण, मदतीसाठी किंचाळण, आपला जीव वाचवण्यासाठी गयावया करणं हे चित्र फार वेदनादायी असल्याचं गुरुनाथ सांगतात. बचाव कार्य सुरू असतानाच इतर सहकाऱयांशी संपर्क करून, त्यांनाही बोलावण्यात आले. एका तासामध्ये 27 जणांना बाहेर काढण्यात आले. यावेळी अनुभवानुसार ज्यांना प्रथम उपचाराची गरज आहे त्यांना आधी रेस्क्यू करण्याचे ठरवले. हे बचाव कार्य करत असताना दोन जीवांनी बाचावकार्यादारम्यान अर्ध्या वाटेतच हातावर प्राण सोडला. यामध्ये एक मुलगी आणि एक मुलगा होता. संपूर्ण वादन ग्रुप असल्याने, यामध्ये सर्वच तरुण मुलं, मुली होते. यातील एका आठवर्षीय मुलाचा देखील मृत्यू झाला होता. बचाव कार्यासाठी "अपघातग्रस्थांच्या मदतीला" या संस्थेचे 50 सदस्य आणि "शिवदुर्ग" या संस्थेचे 50 सदस्य कार्य करत होते. यामध्ये गुरुनाथ साठेलकर यांच्या दोन मुली पूजा आणि भक्ती या दोघी देखील काम करत होत्या. प्रत्यक्ष घटनास्थळावरुन जखमींना रुग्णवाहिकेत बसवणे, त्यांना प्रथमोपचार देणे, त्यांची नोंद करून घेणे, माहिती गोळा करणे, मृतदेह उचलणे, शवागृहामध्ये ठेवणे, शवविच्छेदन झाल्यावर त्यांच्या ओळखिनुसार नातेवाईकांच्या ताब्यात देणे, रुग्णवाहिका उपलब्द करून मृतदेह रुग्णवाहिकेत नातेवाईकांसोबत रवाना करणे ही सर्व कामे या दोन संस्थांचे सदस्य अगदी निस्वार्थीपणाने करत होते. 

आजवर दहा हजार लोकांचे प्राण वाचवल्याची नोंद

   गुरुनाथ साठेलकर हे मदत करण्यासाठी नेहेमीच पुढे असतात. समज आल्यापासून ते मदतीचे काम करत आहेत. मात्र मागील 35 वर्षांपासून अधिकृत असलेल्या माहितीनुसार साठेलकर आणि त्यांच्या सहकाऱयांनी आजवर जवळपास दहा हजार लोकांचे जीव वाचवले आहेत. गुरुनाथ म्हणतात सोशल मीडियाचा योग्य वापर करून काम करणे अधिक सोपे आणि गतिशील होते. व्हाट्सएपच्या माध्यमातून "अपघातग्रस्तांच्या मदतीला" हा ग्रुप तयार केला आणि काहीही घडल्यास या ग्रुपच्या माध्यमातून माहिती दिलीजाते. माहिती मिळताच सर्व सदस्य ऍक्टिव्ह होतात आणि मग कार्याला सुरुवात होते. या ग्रुपमध्ये अनावश्यक मेसेज किंवा गुड मॉर्निंग, गुड नाईट केले जात नाही. यामुळे एखादा घटनेचा मेसेज आला की तात्काळ तो मेसेज सर्वांना मिळतो. ग्रुपमध्ये पोलीस अधिकारी, अग्निशमन दल सदस्य, सर्पमित्र, जलतरणपटू, मदतीसाठी तत्पर असणारी मंडळी आणि पत्रकार देखील समाविष्ठ आहेत. हे कार्य प्रत्येकजण
आपल्या इच्छेने आणि कोणत्याही मोबदल्याशिवाय करत आहे. 

दहा हजार प्राण वाचवणाऱ्या या संस्थेला महाराष्ट्र भूषण द्यावा


    प्रत्येकालाच सामाजिक जाणिवेतून काम करण्याची आवड असते असे नाही. मात्र गुरुनाथ साठेलकर यांच्यासारखी माणसे आपल्याला इतरांच्याच मदतीसाठी झोकून देतात, आणि प्रत्येक घटनास्थळी जाऊन दुखापतग्रस्ताचे प्राण वाचवतात हे कार्य महानच आहे. तर वयक्तिक स्थरावर सुरू केलेले हे काम एका संघटनात्मक कार्याचा विस्तार करून, तब्बल दहा हजार अपघातग्रस्त नागरिकांचे प्राण वाचवते अशा संस्थेला खऱ्या अर्थाने "महाराष्ट्र भूषण" पुरस्काराने सन्मानितत करणे गरजेचे आहे.

विरेश मधुकर मोडखरकर
संपादक, पत्रकार

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page