अलिबाग, अमूलकुमार जैन
महाराष्ट्र राज्याचे स्वछता दूत तसेच महाराष्ट्र भूषण डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांची जाणीवपूर्वक बदनामी केल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास रायगड जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. संदिप गजानन पाटील, (वय ५३ वर्षे, व्यवसाय नोकरी, रा.सी १६ जे.एस.डब्ल्यु.कॉलनी साळाव ता. मुरुड, जि.रायगड, मुळ रा. हाशिवरे, ता.अलिबाग, जि. रायगड) यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेवदंडा पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, दिनांक १६/०४/२०२३ रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमामध्ये घडलेल्या घटनेनंतर दिनांक १७/०४/२०२३ रोजी सद्भावना पत्रक प्रसिद्धी करून घटनेबाबत प्रतिक्रीया दिली होती, त्या पत्रकात अज्ञात इसमाने दिनांक २२/०४/२०२३ रोजी खोडसाळपणे डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची बदनामी व्हावी या उद्देशाने त्यांच्या नावाने अप्रामाणिकपणे व लबाडीने खोटे पत्रक तयार करून, ते त्यांनीच प्रसिध्द केल्याचे भासवुन लेखी पत्रकाव्दारे अफवा पसरवून धार्मिक संस्कार करण्यात गुंतलेल्या डॉ.आप्पासाहेब यांच्या जगभारतील अनुयायांमध्ये राज्य शासनाबाबत शत्रुत्वाची किंवा व्देशाची भावना किंवा दुष्टावा निर्माण होवुन, सरकार विरुध्द उठाव होईल अशा उद्देशाने खोटे पत्रक तयार करून, ते पत्रक इलेक्ट्रॉनिक माध्यमातुन प्रसिध्द करून, डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची बदनामी केली म्हणुन रेवदंडा पोलीस ठाण्यात संदिप गजानन पाटील यांनी गुन्हा दाखल केला आहे.
रेवदंडा पोलीस ठाण्यात 92/2023 भा.द. वी. कलम 500,501,505(2),505(3) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 200 कलम 66सी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे हे करीत आहेत.
बातमी आवडल्यास शेअर आणि कमेंट्स नक्की करा…