धोक्याच्या इलेक्ट्रिक पोलना उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे रिफ्लेक्टर

उरण, प्रतिनिधी

  उरण-मोरा रस्ता रुंदीकरणानंतर रस्त्याच्या मधोमध उभे असणारे इलेक्ट्रिक पोल वाहनांसाठी धोक्याचे झाले आहेत. रात्रीच्यावेळेस हे पोल दिसत नसल्याने, अपघात होत आहेत. याबाबत नगरपरिषदेकडे माहिती देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याने, नैतिक जावबदारी ओळखून उरण तालुका मराठी पत्रकार संघाने धोकादायक पोलना रिफ्लेक्टर टेप लावली आहे. ज्यामुळे रात्रीच्यावेळेस हे पोल दिसण्यात येतील.
    उरण शहरामध्ये नगरपरिषदेअंतर्गत विविध कामे सुरु आहेत. सुटसुटीत आणि सुखकर प्रवास करता यावा यासाठी रस्ते बांधणी करण्यात येत आहे. गरज असलेल्या ठिकाणी रस्ते रुंद करून, काँक्रिटीकरण  करण्यात येत आहे. नगरपरिषद हद्दीमधील सर्वात महत्वाचा आणि मोठा असणारा उरण-मोरा या रस्त्याचे काम गेली दोन वर्षे सुरु आहे. या रस्त्याचे रुंदीकरण  करून, रस्ता मोठा करण्यात आला आहे. मात्र या रुंदीकरणामुळे आधीच्या रस्त्याच्या कडेला असणारे इलेक्ट्रिक पोल हे नव्या रस्त्याच्या मधोमध आले आहेत. यामुळे हे पोल वाहनांसाठी धोकादायक झाले आहेत. विद्युत मंडळाकडून नव्या पोल आणि विद्युत वाहिन्यांची जोडणी करण्यात येतं आहे. मात्र या कामाला विलंब होत असल्याने, रस्त्यामध्ये मधोमध उभे असणारे पोल सध्या अपघातांना कारण बनत आहेत. रात्रीच्यावेळेस हे पोल वाहन चालकांना दिसत नसल्याने, अनेकदा छोटे मोठे अपघात झाले आहेत. याबाबतची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी इंगळे यांना देऊन, या धोकादायक पोलना रिफ्लेक्टर लावण्याची विनंती उरण तालुका मराठी पत्रकार संघाकडून करण्यात आली होती. मात्र एक महिना उलटूनही 100 रुपये किंमतीची रिफ्लेक्टर टेप नगरपरिषदेला लावता आली नाही. यामुळे याबाबतची नैतिक जावबदारी ओळखून उरण तालुका मराठी पत्रकार संघाने धोकादायक इलेक्ट्रिक पोलना रिफ्लेक्टर टेप लावली आहे. जेणेकरून रात्रीच्या वेळेस न दिसणाऱ्या या पोलवर वाहनांची लाईट पडताच हे पोल दिसतील आणि वाहन चालकांचा प्रवास सुरक्षित होईल.

वाहतूक नियम पाळून वाहतूकस अडथळा होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावा यासाठी नगरपरिषदेने काही दिवसांपूर्वीच एक शॉर्टफिल्म रिलीज केली आहे. यासाठी मोठा खर्च देखील करण्यात आला आहे. मात्र नगरपालिकेकडून होणाऱ्या चुकांची सजा सामान्य वाहनचालकांना भोगावी लागत असेल तर उपाय म्हणून 100 रुपये खर्च करणे सुद्धा नगरपरिषदेला शक्य नाही का? असा प्रश्न उपस्थित राहात आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page