अलिबाग, अमूलकुमार जैन
अलिबाग तालुका मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असल्याने मोठमोठे उद्योगपती सहित विविध क्षेत्रातील नामांकित हे अलिबाग तालुक्यात सेकंड होमच्या शोधात असतात. सेकंड होमसाठी धनदांडगे त्यांच्याकडे असलेल्या धनाचा वापर करून कायद्याची सर्रासपणे पायमल्ली ही स्थानिक दलाल तसेच राजकिय पदाधिकारी यांच्या माध्यमातून केली जात आहे. टाळेबंदी, सणवार आणि सार्वजनिक सुट्टी कात उरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खाडीकिनारी भराव टाकून खारफुटी नष्ट केली जात आहे. स्थानिक प्राधिकरण या भराव तंत्राकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात दिवाळीच्या सुट्ट्यांचे औचित्य साधून मांडवा अलिबाग मार्गावरील किहीम सजा हद्दीतील कामथ खाडी किनाऱ्यावरील मोठ्या प्रमाणात खारफुटीवर टाकण्याचे काम सुरू आहे.
कामथ खाडीकिनारी खारफुटीवर सहा ते सात फुटाचा भराव टाकून खारफुटीची खुलेआम कत्तल केली जात आहे.विशेष म्हणजे या खारफुटीवर होणाऱ्या भरावाकडे महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांचा जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. कामथ खाडीकिनारी दिवसाला शेकडो ट्रकांतून हजारो ब्रास माती या खारफुटी क्षेत्रात टाकली गेली असून याकडे महसूल आणि वन विभागाचे दुर्लक्ष आहे. येथील पर्यावरण संस्था यासंदर्भात सातत्याने आवाज उठवत असताना त्याकडे हेतू:पुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे.खाडीकिनारी भराव टाकून सपाटीकरण करीत आहे. त्यासाठी लागणारी सागरी नियंत्रण विभागाची परवानगी घेण्यात आली नसल्याची दाट शक्यता आहे. तसेच या खारफुटीवर जमीन मालक आणि त्यांना मदत करणारे स्थानिक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे मीडिया सेलचे महाराष्ट्र राज्य सचिव अमूलकुमार भलगट यांनी केली आहे.