अलिबाग, धनंजय कवठेकर
रायगड जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आणि अलिबाग समुद्र किनारा एकाच ठीकणी आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या परिसरातच अवैधरित्या खासगी वाहने मोठ्या संख्येने पार्किंग करुन ठेवण्यात येत आहेत. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्णालयामध्ये रुग्णांना जाणे तसेच बाहेर पडणे फारच अडचणीचे होत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही परिस्थिती जैसे थे असल्याने रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
अलिबाग हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधिक्षक कार्यालय, जिल्हा न्यायालय, जिल्हा परिषद जिल्हा सरकारी रुग्णालयासह अन्य महत्वाची सरकारी, निमसरकारी कार्यालये, बँका, जिल्हा बँक अशी अत्यंत महत्वाची कार्यालये आहेत. कामानिमित्त येथे सातत्याने वर्दळ असते. त्याचप्रमाणे अलिबाग हे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण असल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटकांचा सतत राबता असतो. जिल्हा सरकारी रुग्ण्यायाची इमारत समुद्र किनार्यापासून अगदी जवळ आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेचे कार्यालयही रुग्णालयाच्या समोरच आहे. त्यामुळे या ठिकाणी वेड्यावाकड्या पध्दतीने वाहने पार्किंग करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या आवारातच खासगी रुग्णवाहिकांचा गरडा २४ तास पडलेला असतो.
रुग्णालयाच्या गेटसमोरच मोठ्या संख्येने वाहने पार्किंग केलेली सर्रास पहायला मिळते आहेत. नियमबाह्य पार्किंग केल्यामुळे रुग्णांना घेऊन एखादी रुग्णवाहीका आल्यावर तिला रुग्णालयाच्या आतमध्ये प्रवेश करताना अनेक अडचणी येत आहेत. तर काही प्रसंगी रग्णवाहिका सरकारी रुग्णालयाच्या बाहेर पडतानाही बेकायदा पार्किंगमुळे अडकून पडण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. वाहन बाजूला करण्यासाठी संबंधितांना शोधून आणावे लागत आहे. त्यामध्ये बराच वेळ वाया जात असल्याने रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.
रुग्णालयामध्ये एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास इमारतीमधील नागरिक, रुग्ण, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आतच अडकून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच आतमध्ये मदत पोचवतानाही फार अडथळे पार करावे लागणार असल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग, यांच्यासह अन्य जागरुक नागरिकांनी केली आहे.