अलिबाग, अमूलकुमार जैन
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीतील मौजे थेरोंडा खंडेरावपाडयातील भरवस्तीत असलेल्या खंडोबा मंदिरातील देव्हारातील पाच किलो तिनशे साठ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मुर्ती चोरटयांनी 17 मे 2023 रोजी रात्रीचे समयी चोरीस नेल्याप्रकरणी रेवदंडा पोलिस ठाणे येथे अज्ञात चोरटयांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीच्या रेवदंडा पोलिसांनी मुसक्या आवळून काही मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपीस अलिबाग न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
थेरोंडा पाचपाडे कोळीवाडयाचे कुलदैवत असलेल्या खंडेरावपाडयातील खंडोबा मंदिरात बुधवार दि. 17 मे 2023 रोजी रात्री पावणे आठ ते गुरूवार पहाटे साडेपाचचे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयांनी मंदिरात प्रवेश करून गाभार्यातील एकूण 5 किलो 360 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मुर्ती चोरीस नेल्या. पहाटे पुजाअर्चा करण्यास गेलेल्या ग्रामस्थांच्या निदर्शनास चोरीची घटना आली. त्यानंतर तात्काळ रेवदंडा पोलिस ठाणेकडे घडलेल्या चोरीची घटना कळविण्यात आली.
थेरोंडा खंडेराव पाडा मंदिरात असलेल्या लाकडी देव्हारात पन्नास वर्षापुर्वीच्या मल्हारी मार्तंड, म्हाळसा, भैरीदेवीच्या चांदीच्या मोठया मुर्ती व काळभैरव देवाच्या सहा मुर्ती अंदाजे 3 किलो 160 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या व पाठीमागील बाजून ताब्याचा धातूचा मुलामा व चांदीचा लोलक असलेला तसेच मुंबईकर कुटूंबियाच्या कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या व एकविरा देवीच्या चांदीच्या मुर्ती व पाठीमागील बाजून ताब्याचा धातूचा मुलामा व चांदीचा लोलक असलेला एकूण 1 किलो 260 ग्रॅम वजनाच्या मुर्ती तसेच ढोलके कुटूंबियाच्या एकविरा,म्हाळसा, खंडोबा, भैरीदैवी यांच्या चांदीच्या व पाठीमागील बाजून ताब्याचा धातूचा मुलामा व चांदीचा लोलक असलेला एकूण 940 ग्रॅम वजनाच्या मुर्ती असे एकूण 5 किलो 360 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मुर्ती होत्या. या सर्व मुर्तीची चोरी अज्ञात चोरटयांनी रात्रीचे समयी चोरीस नेल्याची तक्रार गोरखनाथ लक्ष्मण नवरीकर यांनी रेवदंडा पोलिस ठाणे येथे दिली होती.
थेरोंडा खंडेरावपाडयात भव्य खंडोबा मंदिरआहे, या मंदिराचा जिर्णोध्दार सन 2008 मध्ये मुंबई महानगर पालिकेचे माजी नगरसेवक प्रकाश बोबडी यांचे प्रयत्नातून संपन्न झाला आहे. या मंदिरात पन्नास वर्षापुर्वीच्या चांदीच्या मुर्ती होत्या, नित्याप्रमाणे सकाळी खंडोबा मंदिरात ग्रामस्थ नेहमी प्रमाणे मंदिरात पुजाअर्चा करण्यासाठी गेल्या असताना त्यांना मंदिरातील देव्हारात मुर्ती नसल्याचे आढळून आले. यावेळी तेथे परिसरातील ग्रामस्थ जमा झाले व तत्परतेने रेवदंडा पोलिसांना कळविण्यात आले होते.
घटनास्थळी रेवदंडा पोलिस पोलिस निरिक्षक देवीदास मुपडे तात्काळ पोलिस कर्मचारीवर्गासह उपस्थित राहिले, चोरीच्या घटनेचे गांर्भिय व स्थानिक कोळी समाजाच्या भावना लक्ष्यात घेऊन अलिबाग गुन्हे अन्वे. विभागाचे पो.नि. दयानंद गावडे यांनी सुध्दा घटनास्थळी लागलीच धाव घेतली, लागलीच पोलिस तपास सुरू करण्यात आला, तेथील ग्रामस्थांचा जबाब घेऊन पंचनाम्यास सुरूवात करण्यात आली, यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. रेवदंडा पोलिस ठाणे येथे अज्ञात चोरटयांचे विरोधात भादवीकलम 457,380 नुसार गुन्हा नोंदविण्यता आला असून अधिक तपास रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक देविदास मुपडे हे करीत होते.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांनी तपास करीत पंधरा दिवसांच्या आत आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून काही प्रमाणात मुद्देमाल ताब्यात घेत त्याला अलिबाग येथील न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनविण्यात आली आहे.