उरण, प्रतिनिधी
उरण शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान सध्या मद्यपिंचा अड्डा बनला असून, खुलेआम येथे दारू तसेच इतर नशिल्या पदार्थ्यांचे सेवन ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येते. यामुळे येथील महिला असुरक्षित झाल्या आहेत. तर दारूच्या बाटल्या मैदानातच फोडल्या जात असल्याने, येथे खेळणाऱ्या खेळाडूनां इजा होत आहे.
यामुळे उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने याबाबतची तक्रार मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानाची (लाल मैदान) पहाणी करण्यात आली. यावेळी मैदानावर पडलेल्या दारूच्या बाटल्या, फुटलेल्या काचा, अपुऱ्या अवस्थेमध्ये असलेल्या स्वच्छतागृहमध्ये बसलेले मध्यपी, मैदानात टाकला जाणारा कचरा, बंद दिवे, मैदाणाच्या मधोमध होणारी पार्किंग याबाबत चर्चा करण्यात आली. तर फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंच्या काचा लागून झालेल्या दुखापतींबाबत माहिती मुख्याधिकारी यांना देण्यात आली. एकंदरीत सर्व माहिती घेतल्यावर येथील मैदानामध्ये होणाऱ्या गोष्टीचा विचार करून, कारवाईचा बडगा उगारला जाईल असे संकेत मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी दिले आहेत. यामुळे येथील खेळाचे मैदान आता मोकळा श्वास घेणार आहे.