कर्नाळा पक्षी अभयारण्य परिसरातील दिघाटी, चिरनेर जंगल भागात बिबट्याचा संचार जाणवत आहे. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.तशा प्रकारचे फलकही ठिक ठिकाणी वन क्षेत्र पाल पनवेल,कल्हे,उरण कडून लावण्यात आले आहेत.
बिबट्याच्या पाऊलखुणांनतर वनविभागाच्या नागरिकांना सूचना
पनवेल – उरण या तालुक्याला डोंगर भागानी वेढले आहे. या तालुक्यातील कर्नाळा किल्ल्या लगत शासनाच्या अधिपत्याखाली असणारे कर्नाळा पक्षी अभयारण्य असून, अनेक वेळा या परिसरातील जंगलात मोर, लांडगा, भेकड, ससा, डुक्कर, कोल्हा या प्राण्यांसह इतर वन्य प्राणी आढळून आले आहेत. त्यातच दिघाटी, चिरनेर गाव परिसरातील शेतकरी, रहिवाशी हे जंगल परिसरात गेले असता त्यांना बिबट्याचा वावर तसेच सदर बिबट्याच्या पायाचे ठसे आढळल्याची बाब समोर आली आहे. एकंदरीत गणेशोत्सवाच्या काळात बिबट्याचे वास्तव्य येथील भागात आल्याने शेतकरी, रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या घटने संदर्भात कर्नाळा वन क्षेत्रपाल अधिकारी महेंद्र करांडे तसेच उरण वन क्षेत्रपाल अधिकारी नथूराम कोकरे यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की सदर जंगल परिसरात बिबट्याचा वावर आहे. परंतु सध्या तरी बिबट्यानी कोणत्याही प्रकारची हानी केली नाही. नागरिकांनी लहान मुलांना एकट्याना बाहेर सोडू नये, घरातील उरलेले अन्न बाहेर टाकू नये, आपले पाळीव प्राणी गोठ्यात बंदिस्त करुन ठेवावी, नागरीकांनी घराबाहेर पडताना एकट्याने बाहेर न पडता चार पाच जणांनी खबरदारी म्हणून घरा बाहेर पडावे, तसेच घरा बाहेर कोणीही झोपू नये अशा प्रकारचे फलक सध्या जनजागृती म्हणून वन विभागाकडून लावण्यात आले आहेत.
नागरिकांना बिबट्याचा वावर आढळून आला तर वनपाल पनवेल, कल्हे येथील ९८६९८०१८४०/८८०५५०४२८५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही वनवीभागाकडून करण्यात आले आहे.